Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

१ इतिहास 22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 मग दावीद म्हणाला, “याहवेह परमेश्वराचे मंदिर व इस्राएलसाठी होमबलीची वेदी याच ठिकाणी असली पाहिजे.”


मंदिर बांधण्याची पूर्वतयारी

2 दावीदाने इस्राएलमध्ये राहणार्‍या सर्व परकियांना एकत्र करून परमेश्वराच्या मंदिरासाठी चिरे घडविण्याची आज्ञा दिली.

3 प्रवेशद्वारे आणि जोडपट्ट्या यांना लागणारे खिळे तयार करण्यासाठी दावीदाने विपुल प्रमाणात लोखंड, तसेच वजन करता येणार नाही इतका कास्य धातू पुरविला.

4 त्याने मोजता येणार नाहीत इतके गंधसरूचे ओंडके पुरविले, कारण सीदोन व सोर येथील लोकांनी ते प्रचंड प्रमाणात दावीदाकडे आणले होते.

5 दावीदाने विचार केला, “माझा पुत्र शलोमोन तरुण आणि अननुभवी आहे. याहवेहसाठी जे मंदिर बांधावयाचे आहे, ते संपूर्ण जगात अत्यंत भव्य, प्रसिद्ध व वैभवशाली झाले पाहिजे. म्हणून मी ते बांधण्याची पूर्वतयारी करेन.” त्याप्रमाणे आपल्या मृत्यूपूर्वी दावीदाने पुष्कळ तयारी केली.

6 नंतर त्याने त्याचा पुत्र शलोमोनला इस्राएलचे परमेश्वर याहवेहसाठी एक भवन बांधण्याची जबाबदारी दिली.

7 दावीद शलोमोनाला म्हणाला, “याहवेह परमेश्वराच्या नावाने मंदिर बांधावयाची माझी मनापासून इच्छा होती,

8 परंतु माझ्याकडे याहवेहचा हा संदेश आला, ‘तू अनेक युद्ध करून पुष्कळ रक्त वाहिले आहेस. तू माझ्या नावाचे मंदिर बांधू नकोस, कारण तू या पृथ्वीवर माझ्यासमोर पुष्कळ रक्त वाहिले आहे.

9 परंतु तुला एक पुत्र होईल, तो शांतताप्रिय व स्वस्थचित्त मनुष्य असेल. सभोवतालच्या सर्व प्रदेशातील शत्रूपासून मी त्याला विसावा देईन. त्याचे नाव शलोमोन असेल. त्याच्या कारकिर्दीत मी इस्राएलला शांती आणि स्वस्थता देईन.

10 तो माझ्या नावाचे एक मंदिर बांधील. तो माझा पुत्र होईल आणि मी त्याचा पिता होईन. मी इस्राएलावर त्याचे राजासन अनंतकालापर्यंत स्थापन करेन.’

11 “आता माझ्या मुला, याहवेह तुझ्याबरोबर असो आणि तुला यश प्राप्त होवो आणि तू ते बांधशील असे त्यांनी सांगितल्याप्रमाणे याहवेह तुझ्या परमेश्वराचे भवन बांध.

12 तुझे याहवेह तुला सुबुद्धी आणि चातुर्य देवो आणि जेव्हा ते तुला इस्राएलवर अधिकार देतील, तुला त्यांच्या नियमशास्त्राचे पालन करण्याची बुद्धी देवो, म्हणजे तू याहवेह तुझ्या परमेश्वराच्या नियमशास्त्राचे पालन करशील.

13 याहवेहने इस्राएली लोकांना मोशेद्वारे दिलेल्या नियमांचे तू काळजीपूर्वक पालन करशील, तर तू यशस्वी होशील. बलवान हो, धैर्यवान हो. भयभीत आणि निराश होऊ नको.

14 “मी अत्यंत परिश्रम करून याहवेहच्या मंदिरासाठी एक लाख तालांत सोने, दहा लाख तालांत चांदी जमा केली आहे. कास्य आणि लोखंड अगणित प्रमाणात आहेत आणि लाकूड आणि दगडही आहेत. आणि तुलाही त्यात भर घालता येईल.

15 तुझ्याजवळ पुष्कळ कारागीर आहेत: दगड घडविणारे, गवंडी, सुतार आणि प्रत्येक प्रकारचे कामगार.

16 सोने आणि चांदी, कास्य आणि लोखंड—याचे अगणित कारागीर आहेत. आता काम करण्यास सुरू कर, याहवेह तुझ्याबरोबर असो.”

17 नंतर दावीदाने इस्राएलाच्या सर्व पुढार्‍यांना आपला पुत्र शलोमोनला या कामी मदत करण्याची आज्ञा दिली.

18 तो त्यांना म्हणाला, “याहवेह तुमचे परमेश्वर तुमच्याबरोबर नाहीत का? त्यांनी सर्व क्षेत्रात तुम्हाला स्वस्थता दिली नाही का? कारण त्यांनी या प्रदेशाच्या लोकांना माझ्या अधीन केले व या भूमीवर याहवेहचा व त्यांच्या लोकांचा अधिकार आहे.

19 आता तुमच्या याहवेह परमेश्वराला शोधण्याकरिता तुम्ही आपले अंतःकरण आणि आपला जीव लावा. आणि याहवेह परमेश्वराचे मंदिर बांधा म्हणजे याहवेहच्या नामाप्रीत्यर्थ जे मंदिर बांधण्यात येणार आहे, त्यात तुम्हाला याहवेहच्या कराराचा कोश आणि परमेश्वराची पवित्र पात्रे आणता येतील.”

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan