१ इतिहास 20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्तीदावीद राब्बा हस्तगत करतो 1 त्याकाळी वसंतॠतूमध्ये, राजे लोक युद्धावर जात असे, योआबाने इस्राएली सैन्याला युद्धासाठी नेले. त्याने अम्मोन्यांची भूमी उद्ध्वस्त केली व राब्बाह शहराला वेढा घातला, परंतु दावीद यरुशलेमात राहिला. योआबने राब्बाहवर हल्ला करून त्याचा नाश केला. 2 दावीद तिथे पोहोचला, तेव्हा त्याने राब्बाहचा राजा मिलकोम च्या डोक्यावरील मुकुट काढला—तो मुकुट सोन्याचा असून त्याचे वजन सोन्याचा एक तालांत होते व त्यावर मोलवान रत्ने जडविलेली होती; तो दावीदाच्या डोक्यावर ठेवण्यात आला. त्याने त्या शहरातून मोठ्या प्रमाणात लूट घेतली. 3 आणि त्या शहरातील रहिवाशांना त्याने बाहेर आणले व त्यांना करवती, लोखंडी कुदळ आणि कुऱ्हाडीच्या साहाय्याने मजुरी करण्यास लावले आणि त्याने त्यांना वीटभट्टीवर काम करावयाला लावले. दावीदाने अम्मोन्यांच्या सर्व नगरांचे असेच केले. नंतर दावीद व त्याचे सर्व सैन्य यरुशलेमास परतले. दावीदाचे पलिष्ट्यांबरोबर युद्ध 4 कालांतराने, पलिष्ट्यांबरोबर गेजेर येथे युद्ध झाले, सिब्बखय नावाच्या हुशाथी मनुष्याने रेफाईमच्या वंशातील सिप्पय नावाच्या एका मनुष्याला ठार मारले, तेव्हा पलिष्टी शरण आले. 5 पलिष्ट्यांबरोबर झालेल्या आणखी एका युद्धात याईराचा पुत्र एलहानानने लहमी या गित्ती गल्याथाच्या भावाला ठार मारले, ज्याच्या भाल्याची काठी विणकर्याच्या काठीसारखी होती. 6 आणखी गथ येथे झालेल्या दुसर्या एका युद्धात प्रत्येक हाताला सहा बोटे आणि पायाला सहा बोटे; असे एकंदर चोवीस बोटे असलेला एक धिप्पाड मनुष्य होता. तो सुद्धा राफाहच्या वंशातील होता. 7 जेव्हा त्याने इस्राएलची अवहेलना केली, तेव्हा दावीदाचा भाऊ शिमिआचा पुत्र योनाथानने त्याला ठार केले. 8 हे गथ येथील राफाहच्या वंशातील होते आणि ते दावीद व त्याच्या सैनिकांच्या हातून मारले गेले. |
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.
Biblica, Inc.