१ इतिहास 16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्तीकोशापुढे आराधना 1 त्यांनी देवाचा कोश आणला आणि दावीदाने त्यासाठी जो तंबू तयार केला होता त्या ठिकाणी तो ठेवला आणि परमेश्वरासमोर होमार्पणे व शांत्यर्पणे सादर केली. 2 होमार्पणे व शांत्यर्पणे सादर केल्यानंतर दावीदाने लोकांना याहवेहच्या नावाने आशीर्वाद दिला. 3 नंतर त्याने इस्राएल लोकांच्या प्रत्येक स्त्री व पुरुषास एक भाकर, खजुराची एक ढेप व मनुक्यांची एक वडी वाटप केली. 4 इस्राएलच्या याहवेह परमेश्वराचे गौरव, स्तुतिगान व त्यांचे उपकारस्मरण करण्याकरिता दावीदाने कोशापुढे सेवा करणार्या काही लेवी लोकांची नेमणूक केली: 5 वादकांचा प्रमुख आसाफ, पुढच्या श्रेणीत जखर्याह, येइएल, शमिरामोथ, यहीएल, मत्तिथ्याह, एलियाब, बेनाइयाह, ओबेद-एदोम व ईयेल हे सतार व वीणा वाजवित, व आसाफ उंच स्वरात झांज वाजवित असे. 6 बेनाइयाह व यहजिएल हे याजक परमेश्वराच्या कराराच्या कोशापुढे नियमितपणे कर्णे वाजवित. 7 त्या दिवसापासून दावीदाने याहवेहची अशा प्रकारे उपकारस्तुती करण्यासाठी आसाफ व त्याचे सहायक नेमले: 8 याहवेहचे स्तवन करा, त्यांच्या नावाची घोषणा करा; त्यांनी केलेली अद्भुत कृत्ये सर्व राष्ट्रात जाहीर करा. 9 त्यांची स्तुतिस्तोत्रे गा आणि त्यांचे स्तवन करा; त्यांच्या सर्व अद्भुत कार्याचे वर्णन करा. 10 त्यांच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगा; जे याहवेहचा शोध करतात, त्यांचे हृदय हर्षित होवो. 11 याहवेह व त्यांच्या सामर्थ्याकडे पाहा; सतत त्यांचे मुख शोधा. 12 परमेश्वराने केलेली अद्भुत कार्ये, त्यांचे चमत्कार, आणि त्यांनी केलेले न्याय यांचे स्मरण करा. 13 अहो त्यांचे सेवक, इस्राएलच्या वंशजांनो, त्यांच्या निवडलेल्या लोकांनो, याकोबाच्या संतानांनो, तुम्ही या सर्वांचे स्मरण करा. 14 कारण याहवेह आमचे परमेश्वर आहेत. त्यांचे न्याय सर्व पृथ्वीवर आहेत. 15 ते आपला करार सर्वदा स्मरणात ठेवतात, ती अभिवचने त्यांनी हजारो पिढ्यांना दिली होती, 16 हा करार त्यांनी अब्राहामाशी केला, आणि इसहाकाशी शपथ वाहिली, 17 आणि त्यांनी याकोबासाठी नियम व इस्राएलसाठी सदासर्वकाळचा करार या रूपाने कायम केला: 18 “मी तुम्हाला कनान देश तुमचे वतन म्हणून देईन.” 19 त्यावेळी इस्राएली लोक अगदी मोजके होते निश्चितच थोडे, वचनदत्त देशात ते परके होते. 20 ते एका देशातून दुसर्या देशात, एका राज्यातून दुसर्या राज्यात भटकत असताना, 21 याहवेहने कोणालाही त्यांच्यावर जुलूम करू दिला नाही; त्यांच्याकरिता त्यांनी राजांना दटाविले: 22 “माझ्या अभिषिक्तांना स्पर्श करू नका; माझ्या संदेष्ट्यांना इजा करू नका.” 23 हे सर्व पृथ्वी, याहवेहस्तव स्तुतिस्तोत्रे गा, दररोज त्यांच्या तारणाची घोषणा करा. 24 सर्व राष्ट्रांमध्ये त्यांचे गौरव, सर्व लोकांमध्ये त्यांची अद्भुत कृत्ये जाहीर करा. 25 कारण याहवेह थोर आणि स्तुतीस पात्र आहेत; सर्व दैवतांपेक्षा त्यांचे भय बाळगणे यथायोग्य आहे. 26 इतर देशांची दैवते केवळ मूर्ती आहेत. परंतु याहवेहनी आकाशमंडलांची रचना केली आहे. 27 राजवैभव आणि ऐश्वर्य त्यांच्या पुढे चालतात. त्यांच्या उपस्थितीत सामर्थ्य आणि हर्ष असतो. 28 अहो राष्ट्रातील सर्व कुळांनो याहवेहला गौरव द्या, याहवेहला गौरव आणि सामर्थ्य द्या. 29 याहवेहच्या नावाला योग्य तो गौरव द्या; अर्पणे आणून त्यांच्या समक्षतेत या. त्यांच्या पवित्रतेच्या ऐश्वर्याने याहवेहची उपासना करा; 30 त्यांच्या उपस्थितीत हे पृथ्वी कंपित हो! सर्व सृष्टी दृढपणे स्थिर झालेली आहे; ती डळमळत नाही. 31 आकाशे हर्ष करोत, पृथ्वी उल्लास करो; त्यांनी राष्ट्रांना हे सांगावे, “याहवेह राज्य करतात!” 32 सागर व त्यातील सर्वकाही गर्जना करोत; शेते व त्यातील सर्वकाही हर्षित होवो! 33 वनातील सर्व झाडे गुणगान करो, आनंदाने याहवेहची स्तुती करा, कारण ते पृथ्वीचा न्याय करण्यास येत आहेत. 34 याहवेहचे उपकारस्मरण करा, कारण ते चांगले आहेत; त्यांची प्रीती अनंतकाळची आहे. 35 यांचा धावा करून म्हणा, हे आमच्या परमेश्वरा, आमचे तारण करा; परमेश्वरा, आम्हाला या देशातून सोडवून एकत्र करा, जेणेकरून आम्ही तुमचे पवित्र नाव धन्यवादित करून, तुमच्या स्तवनात गौरव मानावे. 36 इस्राएलचे परमेश्वर याहवेहची, अनादिकालापासून अनंतकालापर्यंत स्तुती होवो. मग सर्व लोकांनी म्हटले “आमेन! याहवेहची स्तुती होवो.” 37 दररोज गरजेप्रमाणे आसाफ आणि त्याचे भाऊबंद यांची याहवेहच्या कोशाची नियमितपणे करारबद्ध सेवा करण्यासाठी दावीदाने नेमणूक केली. 38 तसेच ओबेद-एदोम आणि त्याचे अडुसष्ट नातलग आणि यदूथूनाचा पुत्र ओबेद-एदोम आणि होसाह यांचा द्वारपाल म्हणून समावेश केला. 39 दावीदाने गिबोन टेकडीवरील याहवेहच्या सभामंडपात सादोक याजक आणि त्याचे याजक भाऊबंद सेवा करण्यासाठी ठेवले. 40 ते दररोज, सकाळ व संध्याकाळ, याहवेहने इस्राएली लोकांना दिलेल्या आज्ञेनुसार होमवेदीवर नियमितपणे होमार्पणे करीत होते. 41 त्यांच्यासोबत हेमान, यदूथून आणि नावे घेऊन निवडलेल्या इतर अनेकांची नेमणूक केली. या सर्वांना “याहवेहची प्रीती सनातन आहे” अशी त्यांची उपकारस्तुती करण्यासाठी नेमण्यात आले होते. 42 त्यांच्याबरोबर हेमान आणि यदूथून यांना कर्णे, झांजा व इतर वाद्ये वाजवून परमेश्वराची स्तुती करण्याची जबाबदारी दिली. यदूथूनच्या पुत्रांची द्वारपाल म्हणून नेमणूक करण्यात आली. 43 नंतर सर्व लोक आपापल्या नगरास परत गेले आणि दावीदही आपल्या कुटुंबीयांना आशीर्वाद देण्यासाठी घरी परतला. |
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.
Biblica, Inc.