१ इतिहास 12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्तीदावीदास येऊन मिळालेले योद्धे 1 कीशाचा पुत्र शौलाच्या सानिध्यातून हद्दपार केलेले असताना दावीदाला सिकलाग येथे येऊन मिळालेले योद्धे (ज्यांनी त्याला युद्धात साहाय्य केले त्या योद्ध्यांपैकी असलेले; 2 हे सर्वच धनुर्धारी वीर असून आपल्या डाव्या आणि उजव्या अशा दोन्ही हातांनी गोफणगुंडे व धनुष्यबाण मारण्यात प्रवीण होते. ते सर्वच बिन्यामीन गोत्रातील आणि शौल राजाचे नातलग होते): 3 त्यातील प्रमुख शमाहाचे पुत्र अहीएजर व त्याचा भाऊ योआश, हे गिबियाहचे रहिवासी होते. अजमावेथचे पुत्र यजिएल व पेलेट, बेराखाह व अनाथोथचा रहिवासी येहू. 4 इश्मायाह हा गिबोनी होता. हा तीस वीरांतील अत्यंत शूरवीर असून त्या तिसांवरील मुख्य होता. यिर्मयाह, यहजिएल, योहानान, गदेराथी योजाबाद, 5 एलूजय, यरिमोथ, बाल्या, शमारियाह व हरूफी शफात्याह, 6 एलकानाह, इश्शीयाह, अजरएल, योबेजर व याशबआम हे सर्व कोरही वंशज होते. 7 योएलाह व जबद्याह हे गदोर येथील यरोहामाचे पुत्र होते. 8 गादचे महान शूर वीरसुध्दा फितूर होऊन दावीद अरण्यवासात असताना त्याच्याकडे गेले. ते ढाली व भाले वापरण्यात निष्णात होते. त्यांचे चेहरे सिंहाच्या मुखासारखे असून ते डोंगरावरील हरणांसारखे चपळ होते. 9 एजेर हा त्यांचा प्रमुख सेनाधिकारी होता. ओबद्याह त्यांचा उपप्रमुख, एलियाब तिसरा, 10 मिश्मन्नाह चौथा, यिर्मयाह पाचवा, 11 अत्तय सहावा, एलीएल सातवा, 12 योहानान आठवा, एलजाबाद नववा, 13 यिर्मयाह दहावा आणि मखबन्नय अकरावा. 14 हे गाद गोत्राचे असून सैन्यातील अधिकारी होते; त्यातील जो सर्वात कनिष्ठ होता, तो शंभरांच्या तोडीचा होता व सर्वात ज्येष्ठ हजाराच्या तोडीचा. 15 वर्षाच्या पहिल्या महिन्यात यार्देन नदी दुथडी भरून वाहत असताना त्यांनी ती ओलांडली आणि नदीच्या खोर्यांत राहणार्या लोकांची त्यांनी पूर्वेकडे व पश्चिमेकडे दाणादाण उडविली. 16 बिन्यामीन व यहूदाह गोत्रातील दुसरे काहीजण दावीदाकडे गडावर आले. 17 दावीद त्यांच्या भेटीसाठी बाहेर आला आणि त्यांना म्हणाला, “तुम्ही मला मदत करावयास शांतीने आला असाल, तर तुम्हाला सहभागी करण्यास मी तयार आहे. पण मी निरपराध असताना मला शत्रूंच्या हवाली करण्यासाठी, माझा विश्वासघात करावयास तुम्ही आला असाल, तर आपल्या पूर्वजांचा परमेश्वर तुम्हाला पाहून घेईल व तुमचा न्याय करेल.” 18 तेव्हा त्या तिसांचा पुढारी अमासयवर पवित्र आत्मा आला आणि अमासय म्हणाला: “दावीद महाराज, आम्ही तुमचे आहोत! अहो इशायपुत्र, आम्ही तुमच्या बाजूचे आहोत! तुम्हाला शांती, कल्याण लाभो, आणि जे तुम्हाला मदत करतील, त्या सर्वांना यश लाभो. कारण तुमचे परमेश्वर तुम्हाला मदत करतील.” मग दावीदाने त्यांचा स्वीकार केला आणि त्यांना आपल्या गनिमी युद्धाच्या सेनेवर अधिकारी नेमले. 19 आणि दावीद पलिष्ट्यांशी शौलाच्या विरुद्ध लढायला गेला तेव्हा मनश्शेह गोत्रातीलही काही लोक दावीदाकडे फितूर झाले. (तरीही दावीद आणि त्याच्या माणसांनी पलिष्ट्यांची मदत केली नाही, कारण सल्लामसलत करून त्यांच्या अधिकार्यांनी त्याला पाठवून दिले. ते म्हणाले, “जर आपला धनी शौल याकडे तो फितूर झाला तर आमची शिरे धोक्यात जातील.”) 20 दावीद सिकलाग येथे जात असताना मनश्शेह गोत्रातील जे लोक दावीदाला येऊन मिळाले, त्यांची यादी पुढे दिली आहे: अदनाह, योजाबाद, यदिएल, मिखाएल, यहोजाबाद, एलीहू व सिलथाई. ते सर्वजण मनश्शेह गोत्रातील उच्च श्रेणीचे सहस्त्राधिपती होते. 21 ते शूर योद्धे होते. त्यांनी पलिष्ट्यांच्या गनिमी युद्धाविरुद्ध दावीदाला मदत केली आणि ते त्याच्या सैन्यात सेनाधिकारी होते. 22 दररोज लोक दावीदाला येऊन मिळत होते. शेवटी त्याच्याकडे परमेश्वराच्या सेनेसारखी प्रचंड सेना जमा झाली. हेब्रोन येथे दावीदाला इतरजण येऊन मिळतात 23 दावीद हेब्रोन येथे असताना, त्याला अनेक कसलेले योद्धे येऊन मिळाले. याहवेहने वचन दिल्याप्रमाणे दावीदाला शौलाच्या जागी राजा होण्यास मदत करावी या उद्देशाने ते आले होते. 24 यहूदाह गोत्रातील ढाल व भाला धारण करणारे हत्यारबंद 6,800 योद्धे; 25 शिमओनी गोत्रातले शूर व पराक्रमी योद्धे 7,100; 26 लेव्यातील 4,600, 27 याजकांपैकी अहरोन घराण्याचा पुढारी यहोयादा होता. त्याच्याबरोबर 3,700 लोक होते. 28 सादोक हा तरुण असून मोठा धैर्यवान लढवय्या होता आणि त्याच्याबरोबर त्याच्या पित्याच्या घराण्यातील 22 सरदार होते; 29 बिन्यामीनच्या म्हणजे शौलाच्या गोत्रातील 3,000, यातील बहुतेक या वेळेपर्यंत शौलाशा एकनिष्ठ राहिले होते; 30 एफ्राईमी, हे महान योद्धे आपआपल्या कुळांमध्ये नामांकित असे पुरुष 20,800; 31 मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रातले लोक दावीदाला राजा होण्यास मदत करण्यासाठी तातडीने पाठविण्यात आलेल्या सैन्यात होते 18,000; 32 इस्साखार गोत्रातले 200 पुढारी आले, काळाची पावले ओळखून इस्राएलने काय करावे हे त्यांना समजत होते. त्यांचे सर्व भाऊबंद त्याच्या आज्ञेत होते; 33 जबुलून गोत्रातले निष्णात लढवय्ये 50,000, ते शस्त्रांनी सुसज्ज व दावीदाला एकनिष्ठ होते; 34 नफतालीचे 1,000 अधिकारी आणि भाले व ढाली यांनी सुसज्ज असे 37,000 सैनिक; 35 दान गोत्राचे लढाईसाठी सुसज्ज सैनिक 28,600; 36 आशेर गोत्राचे अनुभवी, सुसज्ज सैनिक 40,000; 37 यार्देन नदीच्या पूर्वेकडील काठावर राहणारे रऊबेनी, गाद व मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रातील सर्व शस्त्रांनिशी सज्ज सैनिक 1,20,000. 38 हे सर्व योद्धे, जे सेनेत त्यांच्या हुद्यानुसार सहभागी होण्यास स्वेच्छेने आले. ते हेब्रोनला आले तेव्हा दावीदाला इस्राएलचा राजा करणे हा त्यांचा एकच उद्देश होता. वास्तविक पाहता सर्व इस्राएलींनी या गोष्टीस मान्यता दिली होती. 39 त्यांनी तिथे तीन दिवस दावीदाबरोबर घालवून, खाणेपिणे केले, कारण त्यांच्या कुटुंबाने त्यांचा तसा प्रबंध केला होता. 40 शेजारच्या लोकांनी म्हणजे इस्साखार, जबुलून व नफताली प्रांतांपर्यंत जे राहत होते, त्यांनी भाकरीचे पीठ, अंजिरांच्या ढेपा, खिसमिसांचे घड, द्राक्षारस, तेल इत्यादी खाण्याच्या वस्तू गाढवे, उंट खेचरे व बैल यांच्यावर लादून आणल्या होत्या. त्याचप्रमाणे असंख्य बैल व शेरडेमेंढरे पण आणली होती. कारण इस्राएलात सर्वत्र आनंदोत्सव साजरा होत होता. |
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.
Biblica, Inc.