Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

जखर्‍या 9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


शेजारच्या राष्ट्रांचा न्याय

1 हद्राख देशाविषयी परमेश्वराची वाणी : ती दिमिष्कास पोचवून तेथे स्थिर होईल; कारण परमेश्वराची नजर मनुष्यजातीकडे व इस्राएलाच्या सर्व वंशांकडे आहे;

2 त्याच्या सीमेवरल्या हमाथाकडे आणि सोर व सीदोन ह्यांच्याकडेही ती आहे; कारण ती फार शहाणी आहेत.

3 सोराने आपणासाठी मजबूत दुर्ग बांधला, धुळीप्रमाणे रुप्याचा व रस्त्यावरील चिखलाप्रमाणे सोन्याचा संचय केला.

4 पाहा, प्रभू त्याची सत्ता काढून घेईल, त्याची तटबंदी समुद्रात टाकील; ते अग्नीने भस्म होईल.

5 अष्कलोन हे पाहून घाबरेल; गज्जाही हे पाहून वेणा देईल, व एक्रोनही असेच करील, कारण त्याची आशा नष्ट होऊन ते लज्जित होईल; गज्जात राजा नाही असे होईल, अष्कलोनात वस्ती व्हायची नाही.

6 अश्दोदात जारज (मिश्रवंशीय) वस्ती करतील व मी पलिष्ट्यांचा अभिमान नाहीसा करीन.

7 मी त्याच्या मुखातले रक्त1 व त्याच्या दातांतले अमंगळ पदार्थ काढून टाकीन; तोही आमच्या देवासाठी शेष राहील; तो यहूदातल्या सरदारासारखा होईल व एक्रोन यबूशासारखा होईल.

8 कोणी येऊजाऊ नये म्हणून मी सैन्य रोखण्यासाठी माझ्या मंदिराभोवती तळ देईन; जुलूम करणारा पुन्हा त्यांच्यावर चाल करून जाणार नाही; कारण आता मी प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे.


सीयोनेचा भावी राजा

9 सीयोनकन्ये, जोराने आनंदाचा गजर कर; यरुशलेमकन्ये, गजर कर; पाहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे; तो न्यायी व यशस्वी आहे; तो लीन आहे; गाढवावर, गाढवीच्या पिलावर म्हणजे शिंगरावर बसून येत आहे.

10 एफ्राइमातले रथ, यरुशलेमेतले घोडे मी नष्ट करीन; युद्धधनुष्य तोडून टाकण्यात येईल, तो राष्ट्रांबरोबर शांतीच्या गोष्टी बोलेल; त्याचे आधिपत्य प्रत्येक समुद्रावर व फरात नदापासून ते पृथ्वीच्या दिगंतापर्यंत चालेल.


सीयोनेचा जीर्णोद्धार

11 तुझ्याविषयी म्हणशील तर तुझ्याबरोबर केलेल्या कराराच्या रक्तसिंचनामुळे मी तुझ्या बंदिवानांना निर्जल गर्तेतून मुक्त करीन.

12 आशा धरून राहिलेले बंदिवानहो, दुर्गाकडे परत या; आज मी हे जाहीर करतो की, मी तुला दुप्पट प्रतिफळ देईन.

13 मी यहूदारूप धनुष्य वाकवून एफ्राइमरूप बाण लावला आहे; हे सीयोने, मी तुझ्या पुत्रांना चेतवीन; हे ग्रीसा,2 त्यांना तुझ्या पुत्रांविरुद्ध चेतवीन; वीराच्या खड्गाप्रमाणे तुला करीन.

14 त्यांच्यावरती परमेश्वर दृष्टीस पडेल, त्याचे बाण विद्युल्लतेसारखे सुटतील; प्रभू परमेश्वर रणशिंग फुंकील व दक्षिणेकडच्या वावटळीत कूच करील;

15 सेनाधीश परमेश्वर त्यांचा सांभाळ करील; ते शत्रूंना गिळतील व गोफणगुंडे पायांखाली तुडवतील; ते पितील व द्राक्षारस प्याल्याप्रमाणे गोंगाट करतील; ते यज्ञाच्या कटोर्‍यांसारखे, वेदीच्या कोपर्‍यांसारखे भरून राहतील.

16 परमेश्वर त्यांचा देव आपल्या लोकांचा कळपासारखा त्या दिवशी बचाव करील; कारण ते त्याच्या देशात मुकुटावरील रत्नांप्रमाणे उंच स्थानी शोभतील.

17 त्यांची आबादानी केवढी! त्यांचे सौंदर्य केवढे! धान्य तरुणांना आणि नवा द्राक्षारस तरुणींना धष्टपुष्ट करील.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan