जखर्या 6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)चार रथ 1 पुन्हा मी आपले डोळे वर केले तेव्हा पाहा, दोन पर्वतांमधून चार रथ येत आहेत असे दिसले; ते पर्वत पितळेचे होते. 2 पहिल्या रथाला तांबडे घोडे होते; दुसर्या रथाला काळे घोडे होते; 3 तिसर्या रथाला पांढरे घोडे होते व चौथ्या रथाला कबरे लालसर घोडे होते. 4 तेव्हा माझ्याबरोबर भाषण करणार्या दिव्यदूताला मी विचारले, “माझ्या स्वामी, हे काय आहेत?” 5 दिव्यदूताने मला उत्तर केले, “हे आकाशातले चार वारे1 आहेत; ते अखिल पृथ्वीच्या प्रभूच्या हुजुरास असून आता बाहेर निघत आहेत. 6 काळे घोडे असलेला रथ उत्तर देशाकडे जात आहे; पांढरे घोडे त्यांच्या मागून (पश्चिम देशाकडे) जात आहेत; कबरे घोडे दक्षिण देशाकडे जात आहेत.” 7 तांबडे घोडेही बाहेर गेले; त्यांचा पृथ्वीभर फिरण्याचा रोख होता; त्यांना तो म्हणाला, “चला, पृथ्वीवर फिरा.” तेव्हा ते पृथ्वीवर फिरले. 8 मग त्याने मला हाक मारून म्हटले, “पाहा, उत्तर देशाकडे जाणार्यांनी उत्तर देशात माझा आत्मा शांत केला आहे.” यहोशवाला प्रतीकात्मक मुकुट 9 मग परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की, 10 “बंदिवासातून आलेल्या लोकांपैकी हेल्दय, तोबीया व यदया ह्यांच्या माणसांना बरोबर घे; ते बाबेलहून येऊन सफन्याचा पुत्र योशीया ह्याच्या घरी उतरले आहेत, तेथे आजच्या आज जा. 11 सोनेरुपे घेऊन मुकुट घडव व तो यहोसादाकाचा पुत्र यहोशवा मुख्य याजक ह्याच्या मस्तकी घाल. 12 त्याला सांग की, ‘सेनाधीश परमेश्वर म्हणतो, पाहा, एक पुरुष, ज्याचे नाव कोंब असे आहे तो आपल्या स्थानी उगवेल व तो परमेश्वराचे मंदिर बांधील. 13 तोच परमेश्वराचे मंदिर बांधील; तो वैभवशाली होईल; तो आपल्या सिंहासनावर बसून सत्ता चालवील; तो आपल्या सिंहासनावर याजकही होईल; ह्या दोहोंत शांततेची सल्लामसलत होईल.”’ 14 तो मुकुट हेलेम,2 तोबीया, यदया व सफन्याचा पुत्र हेन ह्यांचे परमेश्वराच्या मंदिरात स्मारक होईल. 15 “मग जे दूर आहेत ते येतील व परमेश्वराचे मंदिर बांधण्यास हातभार लावतील आणि सेनाधीश परमेश्वराने मला तुमच्याकडे पाठवले आहे हे तुम्हांला कळून येईल. परमेश्वर तुमचा देव ह्याचे तुम्ही लक्ष देऊन ऐकाल तर हे घडून येईल.” |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India