Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

जखर्‍या 3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


मुख्य याजक यहोशवा ह्याचा दृष्टान्त

1 तेव्हा मुख्य याजक यहोशवा हा परमेश्वराच्या दिव्यदूतासमोर उभा आहे व त्याचा विरोध करण्यासाठी सैतान त्याच्या उजवीकडे उभा आहे, असे त्याने मला दाखवले.

2 मग परमेश्वर सैतानास म्हणाला, “अरे सैताना, परमेश्वर तुला धमकी देवो; यरुशलेम आपलीशी करणारा परमेश्वर तुला धमकी देवो; हा अग्नीतून काढलेले कोलीत नव्हे काय?”

3 यहोशवा मलीन वस्त्रे परिधान करून त्या दिव्यदूतापुढे उभा होता.

4 त्याच्यासमोर जे उभे होते त्यांना तो उत्तरादाखल म्हणाला, “त्याच्यावरची मलीन वस्त्रे काढा.” तो त्याला म्हणाला, “पाहा, मी तुझा अधर्म तुझ्यापासून दूर केला आहे, मी तुला उंची पोशाख घालत आहे.”

5 मी म्हणालो, “त्याच्या डोक्याला त्यांनी स्वच्छ मंदील घालावा.” तेव्हा त्यांनी त्याला स्वच्छ मंदील व पोशाख घातला; आणि परमेश्वराचा दिव्यदूत जवळ उभा होता.

6 परमेश्वराच्या दिव्यदूताने यहोशवास प्रतिज्ञापूर्वक सांगितले की,

7 “सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तू माझ्या मार्गाने चालून तुला मी सोपवलेले सर्व सांभाळले तर तू माझ्या मंदिरात न्याय करशील व माझ्या अंगणाचे रक्षण करशील व तेथे उभे असणार्‍यांत तुझे जाणेयेणे होईल असे मी करीन.

8 आता हे मुख्य याजका, यहोशवा, तू व तुझ्याबरोबर बसणारे तुझे सोबती, तुम्ही ऐका; ती माणसे चिन्हादाखल आहेत; पाहा, मी माझा सेवक जो ‘कोंब’ त्याला आणतो.

9 मी यहोशवापुढे ठेवलेला चिरा पाहा; एका चिर्‍याला सात डोळे आहेत, पाहा, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, मी त्यावर नक्षी खोदीन व त्या देशाचा अधर्म एका दिवसात दूर करीन.

10 सेनाधीश परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी तुम्ही प्रत्येक आपल्या शेजार्‍यास द्राक्षीच्या वेलीखाली व अंजिराच्या झाडाखाली येण्याचे आमंत्रण कराल.”

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan