Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

जखर्‍या 2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


मापनसूत्राचा दृष्टान्त

1 मी आपले डोळे वर करून पाहिले तर पाहा, एक मनुष्य हातात मापनसूत्र घेऊन उभा आहे.

2 तेव्हा मी विचारले, “तू कोठे जात आहेस?” तो मला म्हणाला, “यरुशलेमेचे माप घेण्यास म्हणजे तिची लांबीरुंदी पाहण्यास मी जात आहे.”

3 आणि पाहा, माझ्याबरोबर भाषण करणारा दिव्यदूत जाऊ लागला तेव्हा दुसरा दिव्यदूत त्याला भेटण्यास आला.

4 तो त्याला म्हणाला, “धावत जाऊन त्या तरुणास असे सांग, ‘यरुशलेमेत माणसे व गुरेढोरे फार झाल्यामुळे भिंती नसलेल्या खेड्यांप्रमाणे तिच्यात वस्ती होईल.

5 परमेश्वर म्हणतो, तिच्या सभोवार मी तिला अग्नीचा कोट होईन, व तिच्या ठायी मी तेजोरूप होईन.”’


हद्दपार झालेल्यांना बोलावणे

6 अहो, तुम्ही उत्तरेकडील देशाहून पळून या, असे परमेश्वर म्हणतो; मी तर तुम्हांला आकाशातील चार्‍ही वार्‍यांप्रमाणे चोहोकडे विखरले आहे, असे परमेश्वर म्हणतो.

7 अगे सीयोने, बाबेलकन्येबरोबर राहणारे, आपला बचाव कर.

8 ज्या राष्ट्रांनी तुम्हांला लुटले त्यांच्याकडे प्रताप मिळवण्यासाठी,1 त्याने मला पाठवले आहे; जो कोणी तुम्हांला स्पर्श करील तो त्याच्या डोळ्याच्या बुबुळालाच स्पर्श करील; कारण सेनाधीश परमेश्वर म्हणतो :

9 “पाहा, मी आपला हात त्यांच्यावर उगारीन, व त्यांची सेवा करणारे त्यांना लुटतील; तेव्हा तुम्हांला समजेल की, सेनाधीश परमेश्वराने मला पाठवले आहे.

10 हे सीयोनकन्ये जयजयकार व उल्लास कर; कारण पाहा, मी येईन, मी तुझ्यात वस्ती करीन, असे परमेश्वर म्हणतो.

11 त्या दिवसांत बहुत राष्ट्रे परमेश्वराला येऊन मिळतील व माझी प्रजा बनतील; मी तुझ्या ठायी वस्ती करीन, मग तुला समजेल की, सेनाधीश परमेश्वराने मला तुझ्याकडे पाठवले आहे.

12 परमेश्वर पवित्र भूमीतला आपला वाटा म्हणून यहूदाचा ताबा घेईल व पुन्हा यरुशलेम निवडील.”

13 सर्व मानवहो, परमेश्वरापुढे स्तब्ध व्हा, कारण तो आपल्या पवित्र निवासातून उठला आहे.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan