Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

जखर्‍या 12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


यरुशलेमेचा भावी उद्धार

1 इस्राएलाविषयी परमेश्वराची वाणी : आकाश पसरणारा, पृथ्वीचा पाया घालणारा व मनुष्याच्या अंतर्यामी आत्मा निर्माण करणारा परमेश्वर म्हणतो :

2 “पाहा, मी यरुशलेमेस तिच्या सभोवतालच्या सर्व राष्ट्रांना भेलकंडवणार्‍या कटोर्‍यासारखे करतो; यरुशलेमेला घेरतील तेव्हा यहूदाचीही तीच गत होईल.1

3 त्या दिवशी असे होईल की सर्व राष्ट्रांना भारी होईल अशा पाषाणासारखे मी यरुशलेमेस करीन; जे कोणी तो उचलतील ते स्वतःला जखम करून घेतील; पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे तिच्याविरुद्ध जमतील.

4 परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी मी प्रत्येक घोड्यास बुजवीन व त्यावरील स्वारास वेडे करीन; मी आपले डोळे उघडून यहूदाच्या घराण्याकडे पाहीन व राष्ट्रांच्या प्रत्येक घोड्यास अंधत्व आणीन.

5 तेव्हा यहूदाचे सरदार आपल्या मनात म्हणतील की, ‘यरुशलेमेचे रहिवासी आपला देव सेनाधीश परमेश्वर ह्याच्या योगे मला पाठबळासारखे आहेत.’

6 त्या दिवशी मी यहूदाच्या सरदारांना लाकडाखालच्या आगटीसारखे, पेंढ्याखालच्या जळत्या मशालीसारखे करीन; ते उजवीकडील व डावीकडील सभोवतालच्या सर्व राष्ट्रांना खाऊन टाकतील; यरुशलेम आपल्या पूर्वीच्या जागी म्हणजे यरुशलेमेच्या जागी पुन्हा वसेल.

7 परमेश्वर प्रथम यहूदाचे डेरे वाचवील, म्हणजे दाविदाच्या घराण्याचे वैभव आणि यरुशलेमनिवासी जनांचे वैभव यहूदावर वरचढ व्हायचे नाही.

8 त्या दिवशी परमेश्वर यरुशलेमनिवाशांचे रक्षण करील; त्या दिवशी त्यांच्यातला निर्बल दाविदासमान होईल; व दाविदाचे घराणे देवासमान म्हणजे अर्थात त्यांच्या अग्रगामी परमेश्वराच्या दिव्यदूतासमान होईल.

9 त्या दिवशी असे होईल की, यरुशलेमेवर चढाई करून येणार्‍या सर्व राष्ट्रांचा नाश करण्याची मी खटपट करीन;

10 आणि मी दाविदाच्या घराण्यावर व यरुशलेमेच्या रहिवाशांवर कृपा व विनवणी ह्यांच्या आत्म्याचा वर्षाव करीन आणि ज्या मला त्यांनी विंधले त्या माझ्याकडे2 ते पाहतील; एकुलत्या एका पुत्रासाठी शोक करावा तसे ते त्याच्यासाठी शोक करतील; ज्येष्ठ पुत्राबद्दल जसा कोणी अत्यंत खेद करतो तसा ते त्याबद्दल खेद करतील.

11 त्या दिवशी मगिद्दोनाच्या खोर्‍यातील हदाद्रीमोनाच्या आकांताप्रमाणे यरुशलेमेत मोठा आकांत होईल.

12 देश आक्रंदन करील, प्रत्येक कुटुंब वेगवेगळे आक्रंदन करील; इकडे दाविदाचे घराणे व इकडे त्याचा स्त्रीवर्ग; इकडे नाथानाचे घराणे व इकडे त्याचा स्त्रीवर्ग;

13 इकडे लेवीचे घराणे व इकडे त्याचा स्त्रीवर्ग; इकडे शिमीचे घराणे व इकडे त्याचा स्त्रीवर्ग;

14 उरलेल्या सर्व घराण्यांतले लोक वेगळे व त्यांचा स्त्रीवर्ग वेगळा असे ते आक्रंदन करतील.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan