जखर्या 10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)परमेश्वराने आपल्या लोकांचा केलेला उद्धार 1 वीज उत्पन्न करणार्या परमेश्वराजवळ वळवाच्या पावसाच्या वेळी पाऊस मागा म्हणजे तो त्यांच्यावर वृष्टी करील; तो प्रत्येकाच्या शेतात गवत उपजवील, 2 कारण तेराफीम3 व्यर्थ गोष्टी बोलल्या आहेत, दैवज्ञांनी खोटे दृष्टान्त पाहिले आहेत व फसवणारी स्वप्ने सांगितली आहेत; ते कोरडा धीर देतात; ह्यामुळे ते मेंढरांप्रमाणे भटकले आहेत. त्यांना कोणी मेंढपाळ नसल्यामुळे त्यांच्यावर जुलूम होत आहे. 3 “मेंढपाळांवर माझा क्रोध भडकला आहे, बोकडांचे मी शासन करीन; कारण सेनाधीश परमेश्वराने आपला कळप जे यहूदाचे घराणे त्याची भेट घेतली आहे, तो त्यांना आपल्या लढाईच्या सजवलेल्या घोड्यासारखे करील. 4 त्याच्यापासूनच कोनशिला, त्याच्यापासूनच खुंटी, त्याच्यापासूनच युद्धधनुष्य, त्याच्यापासूनच प्रत्येक अधिकारी निघतो. 5 वाटेतला चिखल तुडवत युद्धाला निघालेल्या योद्ध्याप्रमाणे ते होतील; ते युद्ध करतील, कारण परमेश्वर त्यांच्याबरोबर आहे; घोडेस्वार फजीत होतील. 6 मी यहूदाच्या घराण्यास शक्ती पुरवीन, योसेफाच्या घराण्याची मुक्तता करीन, देशात त्यांची वस्ती करीन; कारण त्यांच्यावर मी करुणा केली आहे; मी त्यांचा त्याग केलाच नाही असे ते होतील; कारण मी परमेश्वर त्यांचा देव आहे, मी त्यांचे ऐकेन. 7 एफ्राईम वीरासारखा होईल, द्राक्षारसाने होते तसे त्यांचे हृदय हर्षित होईल; त्यांची मुले हे पाहून उल्लास पावतील; त्यांचे हृदय परमेश्वराच्या ठायी आनंदेल. 8 मी शीळ घालून त्यांना जमा करीन; कारण मी त्यांना सोडवून घेतले आहे; त्यांची पूर्वी वृद्धी झाली तशी ते वृद्धी पावतील. 9 मी राष्ट्रांमध्ये त्यांची पेरणी करीन; दूर देशात ते माझे स्मरण करतील; ते आपल्या मुलांसहित जिवंत राहून माघारी येतील. 10 मी त्यांना मिसर देशातून माघारी आणीन; अश्शूर देशातून त्यांना एकत्र करीन; गिलाद व लबानोन ह्यांच्या भूमीवर त्यांना आणीन; त्यांना जागा पुरायची नाही. 11 तो संकटसमुद्रातून पार जाऊन समुद्रलहरींना दबकावील; नील नदीचे सर्व गहिरे पाणी सुकून जाईल. अश्शूराचा गर्व उतरेल, मिसरचे राजवेत्र निघून जाईल. 12 मी त्यांना परमेश्वराच्या ठायी बलवान करीन; ते त्याच्या नामाने येतील-जातील,” असे परमेश्वर म्हणतो. |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India