गीतरत्न 8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 तू माझ्या बंधूसारखा, माझ्या मातेचे स्तनपान केलेल्यासारखा असतास तर किती बरे होते! तू मला बाहेर रस्त्यात कोठे भेटल्यास मी तुझे चुंबन घेतले असते. माझी कोणी अप्रतिष्ठा केली नसती. 2 मी तुला आपल्या मातृगृही घेऊन गेले असते, तू मला शिकवले असतेस, मसाला घातलेला द्राक्षारस, माझ्या डाळिंबाचा रस मी तुला पिण्यास दिला असता. 3 त्याचा डावा हात माझ्या डोक्याखाली असो; त्याचा उजवा हात मला आलिंगो. 4 यरुशलेमेच्या कन्यांनो, तुम्हांला शपथ घालून सांगते; माझ्या प्रेमानंदात व्यत्यय आणू नका. विघ्न आणू नका, तो राहील तितका वेळ राहू द्या. प्रेम मृत्यूसारखे प्रबळ 5 आपल्या वल्लभावर ओठंगून रानातून येत आहे ही कोण? सफरचंदाच्या झाडाखाली मी तुझे प्रेम जागृत केले; तेथे तुझी माता तुला प्रसवली; तुझ्या जननीला तेथे प्रसववेदना झाल्या. 6 आपल्या हृदयाशी मला मुद्रेप्रमाणे ठेव, मुद्रेप्रमाणे मला आपल्या बाहूंवर ठेव; कारण प्रेम मृत्यूसारखे प्रबळ आहे; प्रेमसंशय अधोलोकासारखा निष्ठुर आहे; त्याची ज्वाला अग्निज्वालेसारखी, किंबहुना परमेशाने प्रदीप्त केलेला तो अग्नीच आहे. 7 असले प्रेम महाजलांच्यानेही विझवणार नाही; महापुरांनाही ते बुडवून टाकता येणार नाही; मनुष्याने प्रेमासाठी आपल्या घरची सगळी संपत्ती दिली तरी ती त्यापुढे तुच्छ होय. 8 आमची एक धाकटी बहीण आहे, तिला अजून ऊर फुटले नाहीत; आमच्या ह्या बहिणीला मागणी येईल त्या दिवशी आम्ही तिचे काय करावे? 9 ती तटासारखी असली तर तिच्यावर आम्ही रुप्याचा मनोरा बांधू; ती वेशीसारखी असली तर गंधसरूच्या फळ्यांनी तिची बंदिस्ती करू. 10 मी तटासारखी होते, माझे कुच बुरुजासारखे होते, म्हणून मी आपल्या वल्लभाच्या दृष्टीने कृपाप्रसादास पात्र झाले. 11 बाल-हामोन येथे शलमोनाचा एक द्राक्षाचा मळा होता, त्याने तो बागवानांना सोपवून दिला होता; त्यातील फळांबद्दल प्रत्येकाने हजारहजार रुपये द्यायचे होते. 12 माझाही एक द्राक्षीचा मळा आहे; त्यावर माझी मालकी आहे; हे शलमोना, त्याबद्दलचे हजार रुपये तुझे आणि दोनशे रुपये फळांची राखण करणार्यांचे. 13 अगे बागांत राहणारे, तुझ्या सख्या तुझे शब्द ऐकण्यास आतुर झाल्या आहेत; मलाही ते ऐकव. 14 माझ्या वल्लभा, त्वरा कर, सुगंधी वनस्पतींच्या डोंगरांवर हरिणासारखा, मृगीच्या पाडसासारखा तू हो. |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India