गीतरत्न 7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 हे राजकन्ये, तुझे पादत्राणयुक्त पाय किती सुंदर आहेत! कुशल कारागिराच्या हातांनी घडवलेल्या रत्नहारांसारख्या तुझ्या जांघा गोल आहेत. 2 तुझी नाभी वाटोळा गरगरीत पेलाच आहे; त्यात मिश्रित द्राक्षारसाची वाण नाही, तुझे उदर सभोवती भुईकमळे लावलेल्या गव्हाच्या राशीसारखे आहे. 3 तुझे कुचद्वय हरिणीच्या जुळ्या पाडसांसारखे आहे. 4 तुझा कंठ हस्तदंती मनोर्यासारखा आहे; तुझे नेत्र बाथ-रब्बीमच्या वेशीजवळील हेशबोनच्या कुंडांसारखे आहेत; तुझे नाक दिमिष्कासमोरील लबानोनाच्या बुरुजासारखे आहे. 5 तुझा शिरोभाग कर्मेलासारखा आहे; तुझ्या डोक्याचे केस जांभळ्या वस्त्रासारखे आहेत; तुझ्या केशपाशात राजा बद्ध आहे. वधूवरांचा आनंद 6 हे प्रिये, मनोरम विषयांमध्ये तू किती सुंदर, किती चित्ताकर्षक आहेस! 7 तुझा हा बांधा तालवृक्षासारखा आहे; तुझे कुच द्राक्षांच्या घोसांसारखे आहेत. 8 मी म्हटले, मी तालवृक्षावर चढून त्याच्या शाखा धरीन; तेव्हा तुझे कुच मला द्राक्षांच्या घोसांसमान व्हावेत, आणि तुझ्या नासिकेचा श्वास सफरचंदाच्या सुवासासमान व्हावा. 9 तुझे मुख उत्तम द्राक्षारसासमान व्हावे; तो माझ्या प्रियेप्रीत्यर्थ घशात नीट उतरतो; निद्रिस्तांच्याही तोंडांतून तो खाली सहज जातो. 10 मी आपल्या वल्लभाची आहे; त्याचे मन माझ्यावर बसले आहे. 11 माझ्या वल्लभा, ऊठ, आपण गांवढ्यात जाऊ; खेड्यात रात्र घालवू. 12 आपण प्रातःकाळी उठून द्राक्षीच्या मळ्यात जाऊ; तेथे द्राक्षी फुटून तिच्या कळ्या उमलल्या आहेत की काय, डाळिंबीला फुले आली आहेत की काय, ते पाहू; तेथे मी आपले प्रेम तुला अर्पण करीन. 13 पुत्रदात्रीचा सुगंध सुटला आहे; आमच्या दारांवर नाना प्रकारची नव्याजुन्या बारांची उत्तम फळे आहेत; हे माझ्या वल्लभा, ती मी तुझ्यासाठी जतन करून ठेवली आहेत. |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India