Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

गीतरत्न 5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 हे माझे भगिनी, माझे वधू, मी आपल्या बागेत आलो आहे; मी आपला गंधरस व सुगंधी द्रव्ये जमा केली आहेत; मी आपले मधूने थबथबलेले पोळे खाल्ले आहे; मी दुग्ध व द्राक्षारस ही सेवन केली आहेत; मित्रहो, खा; प्रियजनहो, प्या, मनमुराद प्या.


विरहाग्नी

2 मी निद्रिस्त आहे, तरी माझे मन जागृत आहे; ऐका! माझा वल्लभ दार ठोकत आहे! त्याचा शब्द माझ्या कानी पडत आहे; तो म्हणतो, “माझे भगिनी, माझे प्रिये, माझे कपोते, माझे विमले, माझ्यासाठी दार उघड; माझे डोके दवाने थबथबले आहे; माझी झुलपे रात्रीच्या दहिवरबिंदूंनी भरून गेली आहेत.”

3 “मी पेहराव उतरवला आहे, तो पुन्हा कसा लेऊ? मी पाय धुतले आहेत, ते पुन्हा कसे मळवू?”

4 माझ्या वल्लभाने झरोक्यातून आपला हात आत घातला, तेव्हा माझे हृदय त्याच्यासाठी कळवळले.

5 मी आपल्या वल्लभासाठी दार उघडायला उठले तेव्हा अडसराच्या मुठीवरील गंधरस माझ्या हातांना लागला, माझ्या बोटांवरून त्याचा द्रव थिबकला.

6 मी आपल्या वल्लभासाठी दार उघडले, आणि पाहते तर तो निघून गेला होता. तो बोलत होता तेव्हा माझा जीव ठिकाणावर नव्हता; मी त्याचा शोध केला, पण तो सापडला नाही; मी त्याला हाका मारल्या पण त्याने उत्तर दिले नाही.

7 नगरात फिरणारे जागल्ये मला भेटले; त्यांनी मला मार देऊन घायाळ केले; तटाच्या रखवालदारांनी माझा शालू हिसकावून घेतला.

8 यरुशलेमाच्या कन्यांनो, मी तुम्हांला शपथ घालून विनंती करते की माझा वल्लभ तुम्हांला आढळला तर त्याला सांगा मी प्रेमज्वराने पीडित आहे.


वधूकडून वराची प्रशंसा

9 स्त्रियांतल्या परम सुंदरी, तुझ्या वल्लभात इतरांहून अधिक ते काय आहे? तू आम्हांला शपथ घालतेस तर तुझ्या वल्लभात इतरांहून अधिक ते काय आहे?

10 माझा वल्लभ गोरापान व लालबुंद आहे; तो लाखात मोहरा आहे.

11 त्याचे शिर बावनकशी सोन्यासारखे आहे; त्याची झुलपे कुरळी व डोमकावळ्यासारखी काळी कुळकुळीत आहेत.

12 त्याचे डोळे ओढ्याच्या काठांवरील होल्यांसारखे आहेत; ते दुधात डुंबत असून नीट जडलेले आहेत.

13 त्याचे गाल सुगंधोत्पादक वनस्पतींचे ताटवे आहेत. त्याचे ओठ कमलांप्रमाणे असून त्यांतून गंधरस स्रवतो.

14 त्याचे हात पुष्परागाने खचलेल्या सुवर्णनलिकाच होत; त्याचे पोट नीलमणी जडलेल्या हस्तिदंतफलकासारखे आहे.

15 त्याचे पाय सुवर्णाच्या कोंदणात बसवलेल्या संगमरवरी स्तंभांसारखे आहेत. त्याचा बांधा लबानोनासारखा आहे; तो गंधसरूसारखा उमदा आहे;

16 त्याची वाणी परम मधुर आहे; तो सर्वस्वी मनोहर आहे. यरुशलेमाच्या कन्यांनो, माझा वल्लभ, माझा सखा, असा आहे!

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan