Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

गीतरत्न 4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


वधूची वराकडून प्रशंसा

1 अहा! तू सुंदर आहेस! माझ्या सखे, तू सुरूप आहेस! तुझ्या बुरख्याच्या आतून तुझे नेत्र कपोतांसारखे दिसतात. तुझे केस गिलाद डोंगराच्या उतरणीवर बसलेल्या शेरडांच्या कळपासारखे दिसतात.

2 लोकर कातरून धुतलेल्या मेंढ्या जोडीजोडीने येतात, त्यांतल्या कोणाचीही जोडी फुटत नसते, त्यांच्या कळपासारखे तुझे दात आहेत.

3 तुझे ओठ किरमिजी सूत्रासमान आहेत; तुझे मुख रम्य आहे; तुझ्या बुरख्यातून तुझी कानशिले डाळिंबाच्या फाकेसमान दिसतात.

4 तुझी मान दाविदाने शस्त्रागारासाठी बांधलेल्या बुरुजासारखी आहे, त्यावर सहस्र ढाली व वीरांची सगळी कवचे लटकत असतात.

5 भुईकमळांमध्ये चरणार्‍या हरिणींच्या जुळ्या पाडसांप्रमाणे तुझे कुचद्वय आहे.

6 शिळोप्याची छाया नाहीशी होण्याची वेळ येईपर्यंत मी गंधरसाच्या पर्वतावर, उदाच्या टेकडीवर जाऊन राहीन.

7 माझ्या प्रिये, तू सर्वांगसुंदर आहेस; तुझ्यात काही व्यंग नाही.

8 अगे माझ्या वधू! लबानोनावरून माझ्याबरोबर, लबानोनावरून माझ्याबरोबर ये; अमानाच्या माथ्यावरून, सनीर व हर्मोन ह्यांच्या माथ्यांवरून, सिंहांच्या गुहांतून, चित्त्यांच्या पहाडांवरून तू नजर फेक.

9 अगे माझे भगिनी, माझे वधू, तू माझे मन मोहित केले; तुझ्या नेत्रकटाक्षाने, तुझ्या गळ्यातल्या लहानशा हाराने माझे मन मोहिले.

10 अगे माझे भगिनी, माझे वधू! तुझे प्रेम किती मनोरम आहे! तुझे प्रेम द्राक्षारसाहून कितीतरी मधुर आहे! तुझ्या उटण्यांचा वास सर्व प्रकारच्या सुगंधी द्रव्यांहून मधुर आहे!

11 माझे वधू! तुझ्या ओठांतून मधु स्रवतो; तुझ्या जिव्हेखाली मधु व दुग्ध आहेत; तुझ्या वस्त्रांचा सुवास लबानोनाच्या सुगंधासारखा आहे.

12 माझी भगिनी, माझी वधू, ही बंद असलेली बाग, बंद असलेला निर्झर, मोहरबंद कारंजे होय.

13 तुझ्या ठायी सुंदर फळे देणारी डाळिंबाची वाटिका अंकुरित झाली आहे.

14 मेंदी व जटामांसी, जटामांसी व केशर, वेखंड व दालचिनी, उदाची सर्व प्रकारची झाडे, आणि गंधरस व अगरू, तशीच इतर सर्व सुगंधी झाडे तुझ्या ठायी आहेत.

15 बागेतले कारंजे, जिवंत झर्‍याचा कूप, लबानोनाहून वाहून येणारे जलप्रवाह अशी तू आहेस.

16 हे उत्तरवायू, जागृत हो; दक्षिणवायू, तूही ये; माझ्या बागेवरून वाहा, तिचा परिमल पसर. माझा वल्लभ आपल्या बागेत येऊन आपल्या आवडीची फळे सेवन करो.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan