Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

रूथ 3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


खळ्याजवळ रूथ आणि बवाज

1 तिची सासू नामी तिला म्हणाली, “तुझे कल्याण व्हावे म्हणून तुझ्यासाठी एखादे स्थळ मला पाहायला नको काय?

2 तर हे पाहा, ज्याच्या मोलकरणींबरोबर तू राहिलीस तो बवाज आपला आप्त नव्हे काय? तो आज रात्री खळ्यात सातू उफणणार आहे.

3 तर तू नाहणमाखण कर. चांगली वस्त्रे लेऊन खळ्यात जा, पण त्याचे खाणेपिणे संपेपर्यंत त्याच्या नजरेस पडू नकोस.

4 तो कोठे निजतो हे पाहून ठेव आणि तो निजला म्हणजे तू जाऊन त्याच्या पायांवरचे पांघरूण काढून तेथे निजून जा; मग काय करायचे ते तोच तुला सांगेल.”

5 ती म्हणाली, “तुम्ही सांगता ते सगळे मी करीन.”

6 तिने खळ्यात गेल्यावर आपल्या सासूच्या सांगण्याप्रमाणे सर्वकाही केले.

7 खाणेपिणे आटोपल्यावर त्याचे चित्त प्रसन्न होऊन तो जाऊन धान्याच्या राशीच्या कडेशी निजला; मग ती गुपचूप जाऊन त्याच्या पायांवरचे पांघरूण काढून तेथे निजली.

8 मध्यरात्र उलटल्यावर तो माणूस दचकून जागा झाला आणि वर डोके करून पाहतो तर आपल्या पायांजवळ कोणी स्त्री निजलेली आहे असे त्याच्या दृष्टीस पडले.

9 तेव्हा तो तिला म्हणाला, “तू कोण आहेस?” ती म्हणाली, “मी आपली दासी रूथ आहे; ह्या आपल्या दासीला आपल्या पांघरूणाखाली घ्या; कारण आमचे वतन सोडवण्याचा हक्क आपल्याला आहे.”

10 तो म्हणाला, “मुली, परमेश्वर तुझे कल्याण करो, तू पहिल्यापेक्षा दुसर्‍या खेपेस अधिक प्रेमळपणा दाखवलास; कारण श्रीमंत किंवा गरीब अशा कोणाही तरुण पुरुषाच्या नादी तू लागली नाहीस.

11 तर मुली, भिऊ नकोस, तू म्हणतेस तसे मी तुझ्यासंबंधाने करतो; कारण माझ्या गावच्या सर्व लोकांना ठाऊक आहे की तू सद्‍गुणी स्त्री आहेस.

12 मी तुझे वतन सोडवण्याजोगा जवळचा आप्त आहे खरा, तथापि माझ्याहूनही जवळचा आणखी एक आप्त आहे.

13 तू रात्रभर येथे राहा, आणि सकाळी तो तुझ्यासंबंधाने आप्तकर्तव्य करायला तयार झाला तर बरेच; त्याला ते करू दे; पण तुझ्यासंबंधाने आप्तकर्तव्य करायला तो कबूल झाला नाही तर परमेश्वराच्या जीविताची शपथ, मी ते करीन. सकाळपर्यंत निजून राहा.”

14 ती त्याच्या पायाशी पहाट होईपर्यंत निजून राहिली, आणि मनुष्य मनुष्याला ओळखता येण्यापूर्वी ती उठली; कारण बवाजने तिला सांगितले होते की, “खळ्यात कोणी स्त्री आली होती हे कोणाला कळता कामा नये.”

15 तो तिला म्हणाला, “तुझ्या अंगावरची चादर आणून पसरून धर.” तिने ती पसरल्यावर त्याने सहा मापे सातू मापून तिच्या पदरात टाकले व तिच्या खांद्यावर ठेवले; मग ती गावात गेली.

16 सासूकडे ती आली तेव्हा ती तिला म्हणाली, “माझ्या मुली, कसे काय झाले?” तेव्हा त्या माणसाने काय काय केले ते तिने तिला सगळे सांगितले.

17 तिने सांगितले की, “सहा मापे सातू त्याने मला दिले; तो म्हणाला, आपल्या सासूकडे रिकाम्या हातांनी जाऊ नकोस.”

18 ती म्हणाली, “मुली, ह्या गोष्टीचा कसा काय परिणाम होतो ते समजेपर्यंत तू स्वस्थ राहा; कारण आज तो मनुष्य ह्या गोष्टीचा शेवट लावल्याशिवाय राहायचा नाही.”

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan