रूथ 2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)बवाजाच्या शेतात रूथ सरवा वेचते 1 नामीच्या नवर्याचा एक नातेवाईक होता, तो अलीमलेख ह्याच्या कुळातला असून मोठा श्रीमान माणूस होता आणि त्याचे नाव बवाज असे होते. 2 मवाबी रूथ नामीस म्हणाली, “मला शेतात जाऊ द्या म्हणजे कोणाची माझ्यावर कृपादृष्टी झाल्यास त्याच्यामागून मी धान्याचा सरवा वेचत जाईन; ती म्हणाली, “मुली जा. 3 ती जाऊन शेतात कापणी करणार्यांच्या मागून सरवा वेचू लागली. आणि असे झाले की, शेताच्या ज्या भागी ती गेली तो अलीमलेखाच्या कुळातल्या बवाजाचा होता. 4 बवाज बेथलेहेम गावातून शेतात आला तेव्हा तो कापणी करणार्यांना म्हणाला, “परमेश्वर तुमच्याबरोबर असो.” ते त्याला म्हणाले, “परमेश्वर तुमचे अभीष्ट करो.” 5 मग बवाज कापणी करणार्यांच्या मुकादमाला म्हणाला, “ही मुलगी कोणाची?” 6 कापणी करणार्यांच्या मुकादमाने म्हटले, “नामीबरोबर मवाब देशातून आलेली ही मवाबी मुलगी होय. 7 ती मला म्हणाली, ’कृपा करून कापणी करणार्यांच्या मागून पेंढ्यांमधला सरवा मला वेचू द्या; ती तेथे येऊन सकाळपासून आतापर्यंत वेचत आहे, थोडा वेळ मात्र ती घरात बसली होती.”’ 8 बवाज रूथला म्हणाला, “मुली, ऐकतेस ना? तू दुसर्याच्या शेतात सरवा वेचायला येथून जाऊ नकोस; येथेच माझ्या मोलकरणींबरोबर राहा. 9 हे ज्या शेताची कापणी करत आहेत त्याकडे नजर ठेवून त्यांच्यामागून जा; तुला काही त्रास पोचू नये अशी आज्ञा मी ह्या गड्यांना दिली नाही काय? तुला तहान लागल्यास तू भांड्यांकडे जाऊन ह्या गड्यांनी भरून ठेवलेले पाणी पी.” 10 तेव्हा ती त्याला दंडवत घालून म्हणाली, “माझ्यासारख्या परक्या स्त्रीवर आपण कृपादृष्टी करून माझा समाचार घेतलात ह्याचे काय कारण बरे?” 11 बवाज तिला म्हणाला, “तुझा पती मेल्यापासून तू आपल्या सासूशी कशी वागलीस व तू कशा प्रकारे आपली मातापितरे व जन्मभूमी सोडून तुला अपरिचित अशा लोकांत आलीस ही सविस्तर हकिकत मला समजली आहे. 12 परमेश्वर तुझ्या कृतीचे तुला फळ देवो. इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्या पंखांखाली तू आश्रयास आली आहेस, तो तुला पुरे पारितोषिक देवो.” 13 ती म्हणाली, “महाराज आपली कृपादृष्टी माझ्यावर राहू द्यावी; मी आपल्या कोणत्याही दासीच्या बरोबरीची नसून आपण माझ्याशी ममतेने बोलून माझे समाधान केले आहे.” 14 भोजनाच्या वेळी बवाज तिला म्हणाला, “इकडे ये, भाकर खा; ह्या कढीत आपली भाकर बुडव.” त्या कापणी करणार्यांच्या पंक्तीला ती बसली. त्यांनी तिला हुरडा दिला; तो तिने पोटभर खाल्ल्यावर काही शिल्लक राहिला. 15 ती सरवा वेचायला निघाली तेव्हा बवाजने आपल्या गड्यांना सांगितले, “तिला पेंढ्यांत वेचू द्या, मना करू नका; 16 आणि चालता चालता पेंढ्यांतून मूठमूठ टाकत जा; तिला वेचू द्या, तिला धमकावू नका.” 17 तिने ह्या प्रकारे संध्याकाळपर्यंत सरवा वेचला. तिने वेचून आणलेला सरवा झोडला, त्याचे एफाभर सातू निघाले. 18 ते घेऊन ती नगरात गेली; तिने काय वेचून आणले ते तिच्या सासूने पाहिले; तसेच तिने पुरे इतके खाऊन उरलेले आणले होते तेही तिला दिले. 19 तिच्या सासूने तिला विचारले, “आज तू कोठे सरवा वेचलास? हे श्रम तू कोठे केलेस? ज्याने तुझा समाचार घेतला त्याचे कल्याण होवो.” मग आपण कोणाच्या शेतात काम केले ते तिने आपल्या सासूला सांगितले; ती म्हणाली, “ज्या माणसाच्या शेतात आज मी काम केले त्याचे नाव बवाज.” 20 नामी आपल्या सुनेला म्हणाली, “ज्या परमेश्वराने जिवंतावर व मृतांवरही आपली दया करायचे सोडले नाही तो त्याचे कल्याण करो.” नामी तिला आणखी म्हणाली, “हा माणूस आपल्या आप्तांपैकीच आहे. एवढेच नव्हे तर आपले वतन सोडवण्याचा त्याला हक्क आहे.” 21 मग मवाबी रूथने सांगितले की, “तो मला असेही बोलला की, ’माझे गडी सर्व कापणी करीपर्यंत त्यांच्या मागोमाग राहा.”’ 22 नामी आपली सून रूथ हिला म्हणाली, “मुली, तू त्याच्याच मोलकरणींबरोबर जावे, इतरांच्या शेतात तू लोकांना आढळू नयेस हे बरे.” 23 ह्या प्रकारे सातूचा आणि गव्हाचा हंगाम संपेपर्यंत तिने बवाजाच्या मोलकरणींबरोबर सरवा वेचला; आणि ती आपल्या सासूबरोबर राहिली. |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India