Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

प्रकटी 8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


सात कर्ण्यांचा नाद

1 त्याने सातवा शिक्का फोडल्यावर स्वर्गात सुमारे अर्धा तासपर्यंत निवांत झाले.

2 तेव्हा देवासमोर उभे राहिलेले सात देवदूत मी पाहिले. त्यांना सात कर्णे देण्यात आले.

3 मग आणखी एक देवदूत येऊन ‘वेदीपुढे उभा राहिला’ त्याच्याजवळ सोन्याचे धुपाटणे होते; आणि राजासनासमोरच्या सोन्याच्या वेदीवर सर्व पवित्र जनांच्या ‘प्रार्थनांसह धूप’ ठेवण्याकरता त्याच्याजवळ पुष्कळ ‘धूप’ दिला होता.

4 देवदूताच्या हातातून ‘धूपाचा’ धूर पवित्र जनांच्या ‘प्रार्थनांसह’ देवासमोर वर चढला.

5 तेव्हा देवदूताने ‘धुपाटणे’ घेऊन त्यात ‘वेदीवरचा अग्नी भरून’ पृथ्वीवर टाकला आणि ‘मेघांचा गडगडाट व गर्जना’ झाल्या, ‘विजा’ चमकल्या व भूमिकंप झाला.

6 मग ज्या सात देवदूतांजवळ सात कर्णे होते ते आपापले कर्णे वाजवण्यास सिद्ध झाले.

7 पहिल्या देवदूताने कर्णा वाजवला तेव्हा ‘रक्तमिश्रित गारा व अग्नी उत्पन्न होऊन त्यांची पृथ्वीवर’ वृष्टी झाली; आणि पृथ्वीचा तिसरा भाग जळून गेला; एक तृतीयांश झाडे जळून गेली व सर्व हिरवे गवत जळून गेले.

8 दुसर्‍या देवदूताने कर्णा वाजवला, तेव्हा ‘अग्नीने पेटलेल्या’ मोठ्या ‘डोंगरासारखे’ काहीतरी समुद्रात टाकले गेले; समुद्राच्या एक तृतीयांश पाण्याचे रक्त झाले;

9 आणि समुद्रातील प्राण्यांपैकी एक तृतीयांश प्राणी मरण पावले; तसेच एक तृतीयांश तारवांचा नाश झाला.

10 तिसर्‍या देवदूताने कर्णा वाजवला तेव्हा मशालीसारखा पेटलेला मोठा ‘तारा आकाशातून खाली पडला.’ तो नद्यांच्या व झर्‍यांच्या एक तृतीयांश पाण्यावर पडला;

11 त्या तार्‍याचे नाव कडूदवणा; आणि पाण्याच्या एक तृतीयांशाचा कडूदवणा झाला; आणि त्या पाण्याने माणसांपैकी पुष्कळ माणसे मेली; कारण ते कडू झाले होते.

12 चौथ्या देवदूताने कर्णा वाजवला, तेव्हा सूर्याचा एक तृतीयांश, चंद्राचा एक तृतीयांश व तार्‍यांचा एक तृतीयांश ह्यांवर प्रहार झाला. त्यांचा तृतीयांश अंधकारमय व्हावा आणि दिवसाच्या तसे रात्रीच्याही तृतीयांशात प्रकाश दिसू नये म्हणून असे झाले.

13 मी पाहिले तेव्हा एक गरुड अंतराळाच्या मध्यभागी उडताना दृष्टीस पडला; त्याला मोठ्याने असे म्हणताना मी ऐकले : “जे तीन देवदूत कर्णे वाजवणार आहेत त्यांच्या कर्ण्यांच्या होणार्‍या ध्वनीने पृथ्वीवर राहणार्‍या लोकांवर अनर्थ, अनर्थ, अनर्थ येणार!”

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan