Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

प्रकटी 6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


शिक्के फोडण्यात आले

1 मग कोकर्‍याने त्या सात शिक्क्यांपैकी एक शिक्का फोडला ते मी पाहिले, तेव्हा चार प्राण्यांपैकी एक मेघगर्जनेसारख्या ध्वनीने, “ये,”2 असे म्हणाला, ते मी ऐकले.

2 मग मी पाहिले तो एक ‘पांढरा घोडा’, आणि त्याच्यावर बसलेला स्वार माझ्या दृष्टीस पडला; त्याच्याजवळ धनुष्य होते, मग त्याला मुकुट देण्यात आला; तो विजय मिळवत मिळवत आणखी विजयावर विजय मिळवण्यास निघून गेला.

3 त्याने दुसरा शिक्का फोडला, तेव्हा दुसरा प्राणी, “ये”, असे म्हणाला, ते मी ऐकले.

4 तेव्हा दुसरा ‘घोडा’ निघाला; तो ‘अग्निवर्ण’ होता आणि त्याच्यावर बसलेल्या स्वाराकडे पृथ्वीवरील शांतता हरण करण्याचे आणि लोकांकडून एकमेकांचा वध करवण्याचे काम सोपवले होते; त्याला मोठी तलवार देण्यात आली होती.

5 त्याने तिसरा शिक्का फोडला, तेव्हा तिसरा प्राणी, “ये”, असे म्हणाला, ते मी ऐकले. मग मी पाहिले तो एक ‘काळा घोडा’, आणि त्याच्यावर बसलेला कोणीएक माझ्या दृष्टीस पडला; त्याच्या हातात तराजू होते;

6 आणि जणू काय चार प्राण्यांच्या मधून निघालेली वाणी मी ऐकली, ती अशी : “रुपयाला शेरभर गहू, आणि रुपयाला तीन शेर जव; तेल व द्राक्षारस ह्यांची हानी करू नकोस!”

7 त्याने चौथा शिक्का फोडला, तेव्हा चौथा प्राणी, “ये,” असे म्हणाला, ते मी ऐकले.

8 मग मी पाहिले, तो एक फिकट रंगाचा ‘घोडा’, आणि त्याच्यावर बसलेला पुरुष माझ्या दृष्टीस पडला, त्याचे नाव ‘मृत्यू’; आणि ‘अधोलोक’ त्याच्या पाठोपाठ चालला होता. त्यांना ‘तलवारीने, दुष्काळाने, मरीने व पृथ्वीवरील श्वापदांकडून माणसांना जिवे मारण्याचा’ अधिकार पृथ्वीच्या चौथ्या भागावर देण्यात आला.

9 त्याने पाचवा शिक्का फोडला तेव्हा मी वेदीखाली आत्मे पाहिले; ते आत्मे देवाच्या वचनामुळे व त्यांनी जी साक्ष दिली होती तिच्यामुळे जिवे मारलेल्या लोकांचे होते.

10 ते मोठ्याने ओरडून म्हणाले, “हे स्वामी, तू पवित्र व सत्य आहेस. तू ‘कोठपर्यंत न्यायनिवाडा करणार’ नाहीस आणि पृथ्वीवर राहणार्‍या लोकांपासून आमच्या ‘रक्ताचा सूड घेणार’ नाहीस?”

11 तेव्हा त्या प्रत्येकाला एकेक शुभ्र झगा देण्यात आला आणि त्यांना असे सांगण्यात आले की, तुमच्या सोबतीचे दास व तुमचे बंधू तुमच्यासारखे जिवे मारले जाणार, त्यांची संख्या पूर्ण होईपर्यंत तुम्ही आणखी थोडा वेळ विश्रांती घ्या.

12 त्याने सहावा शिक्का फोडला, ते मी पाहिले; तेव्हा मोठा भूमिकंप झाला; ‘सूर्य’ केसांपासून बनवलेल्या तरटासारखा काळा झाला व सगळा ‘चंद्र रक्ता’सारखा झाला;

13 ‘अंजिराचे झाड’ मोठ्या वार्‍याने हालले म्हणजे त्याची कच्ची फळे जशी खाली पडतात तसे ‘आकाशातील तारे’ पृथ्वीवर ‘पडले.’

14 ‘एखादे पुस्तक गुंडाळावे तसे आकाश’ गुंडाळले जाऊन निघून गेले आणि सर्व डोंगर व बेटे आपापल्या ठिकाणांवरून ढळली.

15 ‘पृथ्वीवरील राजे व मोठे अधिकारी’, सरदार, श्रीमंत व बलवान लोक, सर्व दास व सर्व स्वतंत्र माणसे, ‘गुहांत’ व डोंगरांतील ‘खडकांतून लपली;’

16 आणि ते डोंगरांना व खडकांना म्हणाले, “आमच्यावर पडून राजासनावर जो बसलेला आहे, त्याच्या दृष्टीपुढून व कोकर्‍याच्या क्रोधापासून आम्हांला ‘लपवा.’

17 कारण त्याच्या ‘क्रोधाचा मोठा दिवस’ आला आहे, ‘आणि कोणाच्याने टिकाव धरवेल?”’

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan