Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

प्रकटी 2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


इफिस येथील ख्रिस्ती मंडळीला पत्र

1 इफिस येथील मंडळीच्या दूताला लिही : जो आपल्या उजव्या हातात सात तारे धारण करतो, जो सोन्याच्या सात समयांमधून चालतो, तो असे म्हणतो,

2 ‘तुझी कृत्ये, तुझे श्रम व तुझा धीर ही मला ठाऊक आहेत; तुला दुर्जन सहन होत नाहीत, जे प्रेषित नसताना आपण प्रेषित आहोत असे म्हणतात त्यांची परीक्षा तू केलीस; आणि ते लबाड आहेत असे तुला दिसून आले.

3 तुझ्या अंगी धीर आहे. माझ्या नावामुळे तू दुःख सोसले आहेस आणि तू खचून गेला नाहीस.

4 तरी तू आपली पहिली प्रीती सोडली ह्याविषयी तुला दोष देणे मला प्राप्त आहे.

5 म्हणून तू कोठून पतन पावला आहेस त्याची आठवण कर व पश्‍चात्ताप करून आपली पहिली कृत्ये कर; तू पश्‍चात्ताप केला नाहीस तर मी तुझ्याकडे येईन, आणि तुझी समई तिच्या ठिकाणावरून काढून टाकीन.

6 तरीपण तुझ्यात एक आहे की, तू निकलाइतांच्या कृत्यांचा द्वेष करतोस; मीही त्यांच्या कृत्यांचा द्वेष करतो.

7 आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको. जो विजय मिळवतो त्याला, ‘देवाच्या बागेत जे जीवनाचे झाड’ आहे, ‘त्यावरचे’ फळ मी ‘खाण्यास देईन.’


स्मुर्णा येथील ख्रिस्ती मंडळीला पत्र

8 स्मुर्णा येथील मंडळीच्या दूताला लिही; जो पहिला व’ शेवटला, जो मेला होता व जिवंत झाला, तो असे म्हणतो :

9 (तुझी कृत्ये,) तुझे क्लेश व तुझे दारिद्र्य मला ठाऊक आहे (तरी तू धनवान आहेस) आणि जे यहूदी नसताही स्वतःला यहूदी म्हणवतात, पण केवळ सैतानाची सभा आहेत, असे लोक जी निंदा करतात ती मला ठाऊक आहे.

10 तुला जे काही सोसावे लागणार आहे त्याचे भय धरू नको; पाहा, ‘तुमची परीक्षा व्हावी’ म्हणून सैतान तुमच्यापैकी कित्येकांना तुरुंगात टाकणार आहे; आणि तुमचे ‘दहा दिवस’ हालअपेष्टांत जातील. मरेपर्यंत तू विश्वासू राहा, म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईन.

11 आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको. जो विजय मिळवतो त्याला दुसर्‍या मरणाची बाधा होणारच नाही.


पर्गम येथील ख्रिस्ती मंडळीला पत्र

12 पर्गम येथील मंडळीच्या दूताला लिही : ज्याच्याजवळ तीक्ष्ण दुधारी तलवार आहे तो असे म्हणतो,

13 (तुझी कृत्ये व) तू कोठे राहतोस हे मला ठाऊक आहे, सैतानाचे आसन आहे तेथे; तू माझे नाव दृढ धरून राहिला आहेस, आणि जेथे सैतान राहतो तेथे माझा रक्तसाक्षी, माझा विश्वासू अंतिपा जो तुमच्यामध्ये जिवे मारला गेला त्याच्या दिवसांतही तू माझ्यावरील विश्वास नाकारला नाहीस.

14 तथापि तुला थोड्या गोष्टींविषयी दोष देणे मला प्राप्त आहे; त्या ह्या की, ‘बलामाच्या’ शिक्षणाप्रमाणे चालणारे लोक तेथे तुझ्याजवळ आहेत; त्याने ‘मूर्तीला दाखवलेला नैवेद्य खाणे व जारकर्म करणे,’ हे अडखळण ‘इस्राएलाच्या संतानांपुढे’ ठेवण्यास बालाकाला शिकवले.

15 तसेच निकलाइतांच्या तशाच प्रकारच्या शिक्षणाप्रमाणे चालणारे लोकही तुझ्याजवळ आहेत, त्याचा मी द्वेष करतो.

16 म्हणून पश्‍चात्ताप कर, नाहीतर मी तुझ्याकडे लवकरच येऊन आपल्या तोंडातल्या तलवारीने त्यांच्याबरोबर लढेन.

17 आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको. जो विजय मिळवतो त्याला गुप्त ‘राखलेल्या मान्न्यातून मी देईन’ आणि त्याला मी पांढरा खडा देईन; त्या खड्यावर ‘नवे नाव’ लिहिलेले असेल, ते तो खडा घेणार्‍याशिवाय कोणालाही ठाऊक होणार नाही.


थुवतीरा येथील ख्रिस्ती मंडळीला पत्र

18 थुवतीरा येथील मंडळीच्या दूताला लिही : ‘ज्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत,’ आणि ‘ज्याचे पाय सोनपितळेसारखे’ आहेत, तो देवाचा पुत्र म्हणतो :

19 तुझी कृत्ये, आणि तुझी प्रीती, सेवा, विश्वास व धीर ही मला ठाऊक आहेत; आणि तुझी शेवटची कृत्ये पहिल्या कृत्यांपेक्षा अधिक आहेत.

20 तरी तुला दोष देणे मला प्राप्त आहे. कारण ईजबेल नावाची जी स्त्री आपणाला संदेष्ट्री म्हणवते, आणि ‘जारकर्म करण्यास व मूर्तीला दाखवलेला नैवेद्य खाण्यास’ माझ्या दासांना शिकवून भुलवते, तिला तू तसे करू देतोस.

21 तिने पश्‍चात्ताप करावा म्हणून मी तिला अवकाश दिला, तरी आपल्या जारकर्माबद्दल पश्‍चात्ताप करण्याची तिची इच्छा नाही.

22 पाहा, मी तिला अंथरुणाला खिळून टाकीन आणि तिच्याबरोबर व्यभिचार करणार्‍या लोकांना, तिने शिकविलेल्या कृत्यांबद्दल त्यांनी पश्‍चात्ताप न केल्यास, मोठ्या संकटात पाडीन.

23 मी तिच्या मुलाबाळांना जिवे मारीन, म्हणजे सर्व मंडळ्यांना कळून येईल की, मी ‘मने व अंत:करणे ह्यांची पारख करणारा’ आहे आणि तुम्हा ‘प्रत्येकाला ज्याच्या-त्याच्या कृत्यांप्रमाणे प्रतिफळ देईन.’

24 थुवतीरा येथील बाकीचे जे तुम्ही तिच्या शिकवणीप्रमाणे चालत नाही, ज्यांना सैतानाच्या गहन म्हटलेल्या गोष्टी माहीत नाहीत त्या तुम्हांला मी सांगतो की, मी तुमच्यावर दुसरा भार लादणार नाही;

25 इतकेच करा की, जे तुमच्याजवळ आहे ते मी येईपर्यंत दृढ धरून राहा.

26 जो विजय मिळवतो व शेवटपर्यंत माझी कृत्ये करत राहतो ‘त्याला’ माझ्या पित्यापासून मला मिळाला तसा ‘राष्ट्रांवरचा’ अधिकार मी ‘देईन,’

27 ‘आणि जसा मातीच्या भांड्यांचा चुराडा करतात तसा तो लोहदंडाने त्यांच्यावर अधिकार गाजवील;’

28 आणि मी त्याला प्रभाततारा देईन.

29 आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan