प्रकटी 17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)मोठी कलावंतीण व श्वापद 1 नंतर सात वाट्या घेतलेल्या सात देवदूतांपैकी एक जण येऊन माझ्याबरोबर बोलू लागला; तो म्हणाला, “इकडे ये, म्हणजे ‘अनेक जलप्रवाहांवर’ बसलेल्या मोठ्या कलावंतिणीचा2 झालेला न्यायनिवाडा तुला दाखवतो; 2 ‘तिच्याबरोबर पृथ्वीवरील राजांनी जारकर्म केले’ आणि ‘तिच्या’ जारकर्मरूपी ‘द्राक्षारसाने पृथ्वीवर’ राहणारे ‘मस्त झाले.”’ 3 मग मी आत्म्याने संचरित झालो असताना त्याने मला रानात नेले; तेव्हा देवनिंदात्मक नावांनी भरलेल्या आणि सात डोकी व ‘दहा शिंगे’ असलेल्या किरमिजी रंगाच्या ‘श्वापदावर’ बसलेली एक स्त्री माझ्या दृष्टीस पडली. 4 ती स्त्री जांभळी व किरमिजी वस्त्रे ल्याली होती; आणि सोने, मूल्यवान रत्ने व मोती ह्यांनी शृंगारलेली होती. तिच्या हातात अमंगळ पदार्थांनी आणि तिच्या जारकर्माच्या मळाने भरलेला ‘सोन्याचा प्याला’ होता; 5 तिच्या कपाळावर “मोठी बाबेल, कलावंतिणींची1 व पृथ्वीवरील अमंगळपणाची आई,” हे गूढ अर्थाचे नाव लिहिलेले होते. 6 ती स्त्री पवित्र जनांच्या रक्ताने व येशूच्या रक्तसाक्ष्यांच्या रक्ताने मस्त झालेली माझ्या दृष्टीस पडली. तिला पाहून मला फार आश्चर्य वाटले. 7 देवदूताने मला म्हटले, “तुला आश्चर्य का वाटले? ती स्त्री आणि सात डोकी व दहा शिंगे असलेले तिला वाहून नेणारे श्वापद ह्यांचा गूढ अर्थ मी तुला सांगतो. 8 जे ‘श्वापद’ तू पाहिले ते होते आणि नाही; ते ‘अथांग डोहातून वर येणार’ आहे व नाशाप्रत जाणार आहे. जगाच्या स्थापनेपासून ‘ज्यांची’ नावे ‘जीवनाच्या पुस्तकात लिहिली’ नाहीत अशा पृथ्वीवर राहणार्या लोकांना, ते श्वापद होते, नाही, तरी हजर आहे असे पाहून आश्चर्य वाटेल. 9 येथे ज्ञानवंत मनाचे काम आहे. ती सात डोकी म्हणजे सात डोंगर आहेत; त्यांवर ती स्त्री बसली आहे. 10 आणि ती डोकी म्हणजे सात राजे आहेत,2 त्यांपैकी पाच पडले आहेत, एक आहे आणि एक अद्याप आला नाही; तो आल्यावर त्याला थोडा वेळ राहावे लागेल. 11 जे श्वापद होते आणि नाही तेच आठवा राजा आहे; तो त्या सातांपासून झालेला आहे; आणि तो नाशाप्रत जाणार आहे. 12 जी ‘दहा शिंगे’ तू पाहिलीस ‘ती दहा राजे आहेत,’ त्यांना अद्यापि राज्य मिळालेले नाही; तरी त्यांना श्वापदाबरोबर एक तास राजांच्यासारखा अधिकार मिळतो. 13 ते एकविचाराचे आहेत आणि ते आपले सामर्थ्य व अधिकार श्वापदाला देतात. 14 हे कोकर्याबरोबर लढतील, परंतु कोकरा त्यांना जिंकील, कारण तो ‘प्रभूंचा प्रभू आणि राजांचा राजा आहे;’ आणि जे त्याच्याबरोबर आहेत ते पाचारण केलेले, निवडलेले व विश्वासू आहेत.” 15 आणखी तो मला म्हणाला, “जेथे कलावंतीण बसली आहे, तेथे ‘जे जलप्रवाह’ तू पाहिलेस, ते लोक, जनसमूह, राष्ट्रे व निरनिराळ्या भाषा बोलणारे असे आहेत. 16 जी दहा शिंगे व जे श्वापद तू पाहिलेस ते कलावंतिणीचा द्वेष करतील व तिला ओसाड व नग्न करतील, तिचे मांस खातील व तिला अग्नीत जाळून टाकतील. 17 त्यांनी एकविचाराने वागून देवाची वचने पूर्ण होईपर्यंत आपले राज्य श्वापदाला द्यावे अशा इराद्याने कृती करण्याचे देवाने त्यांच्या मनात घातले. 18 जी स्त्री तू पाहिलीस ती ‘पृथ्वीवरच्या राजांवर’ राज्य करणारी मोठी नगरी होय.” |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India