Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

प्रकटी 14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


कोकरा व त्याचे अनुयायी

1 नंतर मी पाहिले, तो पाहा, कोकरा सीयोन डोंगरावर उभा राहिलेला दृष्टीस पडला; त्याच्याबरोबर त्याचे नाव व त्याच्या पित्याचे नाव ‘कपाळावर’ लिहिलेले एक लक्ष चव्वेचाळीस हजार इसम होते;

2 आणि ‘अनेक जलप्रवाहांच्या ध्वनीसारखी’ व प्रचंड मेघगर्जनेच्या ध्वनीसारखी स्वर्गातून निघालेली वाणी मी ऐकली आणि जी वाणी मी ऐकली ती, जसे काय वीणा वाजवणारे आपल्या वीणा वाजवत आहेत, अशी होती.

3 ते राजासनासमोर आणि चार प्राणी व वडील ह्यांच्यासमोर जसे काय ‘एक नवे गीत गात होते;’ ते गीत पृथ्वीवरून विकत घेतलेले एक लक्ष चव्वेचाळीस हजार लोक ह्यांच्याशिवाय कोणाला शिकता येत नव्हते.

4 स्त्रीसंगाने मलिन न झालेले ते हेच आहेत, ते शुद्ध आहेत. जेथे कोठे कोकरा जातो तेथे त्याच्यामागे जाणारे ते हे आहेत. ते देवासाठी व कोकर्‍यासाठी प्रथमफळ असे माणसांतून विकत घेतलेले आहेत.

5 त्यांच्या ‘तोंडात असत्य आढळले नाही;’ ते [देवाच्या राजासनासमोर] निष्कलंक आहेत.


तीन देवदूतांचे संदेश

6 नंतर मी दुसरा एक देवदूत अंतराळाच्या मध्यभागी उडताना पाहिला; त्याच्याजवळ पृथ्वीवर राहणार्‍यांना म्हणजे प्रत्येक राष्ट्र, वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे आणि लोक ह्यांना सांगण्यास सार्वकालिक सुवार्ता होती.

7 तो मोठ्याने म्हणाला, “देवाची भीती बाळगा व त्याचा गौरव करा, कारण न्यायनिवाडा करायची त्याची घटिका आली आहे. ‘ज्याने आकाश, पृथ्वी, समुद्र’ व पाण्याचे झरे ‘निर्माण केले,’ त्याला नमन करा.”

8 त्या देवदूतामागून दुसरा देवदूत येऊन म्हणाला, “‘पडली, मोठी बाबेल पडली, तिने आपल्या’ जारकर्माबद्दलचा क्रोधरूपी ‘द्राक्षारस सर्व राष्ट्रांना पाजला आहे.”’

9 त्यांच्यामागून तिसरा देवदूत येऊन मोठ्याने म्हणाला, “जो कोणी श्वापदाला व त्याच्या मूर्तीला नमन करतो, आणि आपल्या कपाळावर किंवा आपल्या हातावर त्याची खूण करून घेतो,

10 तोही ‘देवाच्या क्रोधाच्या प्याल्यात निरा घातलेला’ त्याचा क्रोधरूपी द्राक्षारस पिईल, आणि पवित्र देवदूतांसमक्ष व कोकर्‍यासमक्ष त्याला ‘अग्नी व गंधक’ ह्यांपासून पीडा होईल.

11 त्यांच्या पीडेचा ‘धूर युगानुयुग वर येतो;’ आणि जे श्वापदाला व त्याच्या मूर्तीला नमन करतात त्यांना, आणि जो कोणी त्याच्या नावाची खूण धारण करून घेतो त्याला ‘रात्रंदिवस’ विश्रांती मिळत नाही.”

12 देवाच्या आज्ञा पाळणारे व येशूवरील विश्वासाला धरून राहणारे पवित्र जन ह्यांचे धीर धरण्याचे अगत्य ह्यातच आहे.

13 तेव्हा स्वर्गातून झालेली वाणी मी ऐकली; ती म्हणाली, “लिही : प्रभूमध्ये मरणारे आतापासून धन्य आहेत.” आत्मा म्हणतो, “खरेच, आपल्या कष्टांपासून सुटून त्यांना विसावा मिळेल; त्यांची कृत्ये तर त्यांच्याबरोबर जातात.”


हंगाम व पृथ्वीची कापणी

14 नंतर ‘मी पाहिले, तेव्हा’ पांढरा मेघ व त्या ‘मेघावर’ बसलेला ‘मनुष्याच्या पुत्रासारखा’ कोणीएक ‘दृष्टीस पडला;’ त्याच्या मस्तकावर सोन्याचा मुकुट व त्याच्या हातात तीक्ष्ण धारेचा विळा होता.

15 तेव्हा आणखी एक देवदूत मंदिरातून निघून, जो मेघावर बसलेला होता त्याला उच्च वाणीने म्हणाला, “तू आपला ‘विळा चालवून’ कापणी कर; कारण ‘कापणीची वेळ आली आहे;’ पृथ्वीचे पीक पिकून गेले आहे.”

16 तेव्हा मेघावर बसलेल्या पुरुषाने आपला विळा पृथ्वीवर चालवला; आणि पृथ्वीची कापणी झाली.

17 मग आणखी एक देवदूत स्वर्गातील मंदिरातून निघाला, त्याच्याजवळही तीक्ष्ण धारेचा विळा होता.

18 ज्याला अग्नीवर अधिकार आहे असा दुसरा एक देवदूत वेदीतून निघाला; त्याने ज्याच्याजवळ तीक्ष्ण धारेचा विळा होता त्याला उच्च वाणीने म्हटले, “तू आपला तीक्ष्ण धारेचा ‘विळा चालवून’ पृथ्वीच्या द्राक्षीचे घड तोडून घे; तिची द्राक्षे पिकली आहेत.”

19 तेव्हा त्या देवदूताने आपला विळा पृथ्वीवर चालवला आणि पृथ्वीच्या द्राक्षीचे घड तोडून देवाच्या क्रोधाच्या मोठ्या द्राक्षकुंडात टाकले.

20 ‘ते द्राक्षकुंड’ नगराबाहेर ‘तुडवले गेले;’ त्यातून रक्त वाहिले, त्याचा प्रवाह घोड्यांच्या लगामांना पोहचेल इतका असून तो शंभर कोसपर्यंत वाहत गेला.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan