Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

प्रकटी 1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


प्रस्तावना व नमस्कार

1 येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण : हे त्याला देवाकडून झाले. ‘ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत त्या’ आपल्या दासांना दर्शवण्याकरता हे झाले; आणि त्याने आपल्या दूताला पाठवून त्याच्याकडून आपला दास योहान ह्याला कळवले.

2 त्याने देवाच्या वचनाविषयी व येशू ख्रिस्ताविषयी म्हणजे त्याने जे जे पाहिले त्यांविषयी साक्ष दिली.

3 ह्या संदेशाचे शब्द वाचून दाखवणारा, ते ऐकणारे व त्यात लिहिलेल्या गोष्टी पाळणारे हे धन्य; कारण समय जवळ आला आहे.

4 आशियातील सात मंडळ्यांना योहानाकडून : जो आहे, जो होता व जो येणार त्याच्यापासून, त्याच्या राजासनासमोर जे सात आत्मे आहेत त्यांच्यापासून,

5 आणि ‘विश्वसनीय साक्षी,’ मेलेल्यांमधून ‘प्रथम जन्मलेला’ व ‘पृथ्वीवरील राजांचा अधिपती’ येशू ख्रिस्त ह्याच्यापासून, तुम्हांला कृपा व शांती असो. जो आपल्यावर प्रीती करतो, ज्याने आपल्या रक्ताने तुम्हांआम्हांला ‘पातकांतून मुक्त केले,’

6 आणि आपल्याला ‘राज्य’ आणि आपला देव व पिता ह्याच्यासाठी ‘याजक’ असे केले, त्याला गौरव व पराक्रम हे युगानुयुग आहेत. आमेन.

7 ‘पाहा, तो मेघांसहित येतो;’ प्रत्येक डोळा त्याला ‘पाहील’, ज्यांनी त्याला ‘भोसकले तेही पाहतील; आणि पृथ्वीवरील सर्व वंश त्याच्यामुळे ऊर बडवून घेतील.’ असेच होणार. आमेन.

8 ‘प्रभू देव जो आहे,’ जो होता व जो येणार, ‘जो सर्वसमर्थ,’ तो म्हणतो, “मी अल्फा व ओमेगा आहे.”2


मनुष्याच्या पुत्राचा साक्षात्कार

9 मी योहान, जो तुमचा बंधू आणि येशूमधील क्लेश, राज्य व धीर ह्यांचा तुमच्याबरोबर भागीदार आहे, तो मी देवाचे वचन व येशूविषयीची साक्ष ह्यांकरता पात्म नावाच्या बेटात होतो.

10 प्रभूच्या दिवशी मी आत्म्याने संचरित झालो, तेव्हा मी आपल्यामागे कर्ण्याच्या नादासारखी मोठी वाणी ऐकली.

11 ती म्हणाली, “[मी अल्फा व ओमेगा, प्रारंभ व शेवट आहे;] तुला जे दिसते ते पुस्तकात लिही, आणि ते [आशियातील] इफिस, स्मुर्णा, पर्गम, थुवतीरा, सार्दीस, फिलदेल्फिया व लावदिकीया येथील सात मंडळ्यांकडे पाठव.”

12 माझ्याबरोबर बोलत असलेली वाणी कोणाची हे पाहण्यास मी मागे वळलो. मागे वळून पाहतो तो सोन्याच्या सात समया,

13 आणि त्या समयांच्या मध्यभागी ‘मनुष्याच्या पुत्रासारखा, पायघोळ वस्त्र परिधान केलेला,’ आणि छातीवरून ‘सोन्याचा’ ‘पट्टा बांधलेला’ असा कोणीएक माझ्या दृष्टीस पडला;

14 ‘त्याचे डोके’ व ‘केस बर्फासारख्या पांढर्‍या लोकरीसारखे,’ पांढरे होते; ‘त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते,’

15 ‘त्याचे पाय’ जणू काय भट्टीतून काढलेल्या जळजळीत ‘सोनपितळेसारखे होते आणि त्याची वाणी अनेक जलप्रवाहांच्या ध्वनीसारखी होती.’

16 त्याच्या उजव्या हातात सात तारे होते; त्याच्या तोंडातून तीक्ष्ण दुधारी तलवार निघाली आणि त्याची मुद्रा ‘परमतेजाने’ प्रकाशणार्‍या ‘सूर्यासारखी’ होती.

17 मी त्याला पाहिले तेव्हा मी मेल्यासारखा त्याच्या पायांजवळ पडलो. मग त्याने आपला उजवा हात माझ्यावर ठेवून मला म्हटले, “भिऊ नकोस; जो पहिला व शेवटला, आणि जो जिवंत तो मी आहे;

18 मी मेलो होतो तरी पाहा, मी युगानुयुग जिवंत आहे, आणि मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या माझ्याजवळ आहेत.

19 म्हणून जे तू पाहिले, जे आहे व ह्यानंतर जे होणार ते लिहून ठेव;

20 जे सात तारे तू माझ्या उजव्या हातात पाहिले त्यांचे, आणि सोन्याच्या त्या सात समयांचे ‘गूज’ हे आहे; ते सात तारे हे सात मंडळ्यांचे दूत आहेत; आणि सात समया ज्या तू पाहिल्या त्या सात मंडळ्या आहेत.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan