स्तोत्रसंहिता 98 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)देवाच्या नीतिमत्त्वाबद्दल स्तुती स्तोत्र. 1 परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा, कारण त्याने अद्भुत कृत्ये केली आहेत; त्याने आपल्या उजव्या हाताने, आपल्या पवित्र बाहूने स्वत:साठी विजय साधला आहे. 2 परमेश्वराने आपला विजय विदित केला आहे; राष्ट्रांसमक्ष आपले न्यायीपण प्रकट केले आहे. 3 त्याने इस्राएलाच्या घराण्यावरील आपली दया व आपली सत्यता ह्यांचे स्मरण केले आहे; पृथ्वीच्या सर्व सीमांनी आमच्या देवाचा विजय पाहिला आहे. 4 अहो पृथ्वीवरील सर्व लोकहो, परमेश्वराचा जयजयकार करा; उच्च स्वराने, आनंदाने गा; त्याची स्तोत्रे गा. 5 परमेश्वराचे गुणगान वीणेवर करा, वीणेवर सुस्वर स्तोत्र गा. 6 कर्णा व शिंग वाजवून परमेश्वर राजासमोर जयघोष करा. 7 समुद्र व त्यातील सर्वकाही, जग व त्यात राहणारे हर्षनाद करोत. 8 नद्या टाळ्या वाजवोत; पर्वत एकवटून परमेश्वरासमोर आनंदाने गावोत; 9 कारण तो पृथ्वीचा न्याय करण्यास आला आहे; तो जगाचा न्याय यथार्थतेने करील, व लोकांचा न्याय सरळपणे करील. |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India