स्तोत्रसंहिता 96 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)उपकारस्तुतीचे गीत ( १ इति. 16:23-33 ) 1 परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा. हे सर्व पृथ्वी, परमेश्वराचे गुणगान कर. 2 परमेश्वराचे गुणगान करा, त्याच्या नावाचा धन्यवाद करा; त्याने केलेल्या तारणाची घोषणा प्रतिदिवशी करा. 3 राष्ट्रांमध्ये त्याचा गौरव, सर्व लोकांमध्ये त्याची अद्भुत कृत्ये जाहीर करा. 4 कारण परमेश्वर थोर व परमस्तुत्य आहे; सर्व देवांहून त्याचेच भय धरणे योग्य आहे. 5 कारण राष्ट्रांचे सर्व देव केवळ मूर्ती1 आहेत; परमेश्वर तर आकाशाचा निर्माणकर्ता आहे. 6 मान व महिमा त्याच्यासमोर आहेत; सामर्थ्य व सौंदर्य त्याच्या पवित्रस्थानी आहेत; 7 अहो मानवकुलांनो, परमेश्वराचा गौरव करा; परमेश्वराचा गौरव करा व त्याचे सामर्थ्य वाखाणा. 8 परमेश्वराच्या नावाची थोरवी गा; अर्पण घेऊन त्याच्या अंगणात या; 9 पवित्रतेच्या शोभेने परमेश्वराची उपासना करा; हे सर्व पृथ्वी त्याच्यापुढे कंपायमान हो. 10 राष्ट्रांमधील लोकांना विदित करा की, “परमेश्वर राज्य करतो. जग स्थिर स्थापलेले आहे, ते डळमळणार नाही. तो सरळपणे लोकांचा न्याय करील.” 11 आकाश हर्ष करो, पृथ्वी उल्लास करो, समुद्र व त्यातील सर्वकाही गर्जना करोत; 12 शेत व त्यातील सर्वकाही उत्सव करोत; मग वनांतील सर्व झाडे परमेश्वरासमोर आनंदाचा गजर करतील; 13 कारण तो आला आहे; पृथ्वीचा न्याय करायला तो आला आहे; तो न्यायीपणाने जगाचा व सत्यतेने लोकांचा न्याय करील. |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India