स्तोत्रसंहिता 9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)देवाच्या न्याय्यत्वाबद्दल उपकारस्तुती मुख्य गवयासाठी; मूथ-लब्बेन ह्या रागावर गायचे दाविदाचे स्तोत्र. 1 मी अगदी मनापासून परमेश्वराचे उपकारस्मरण करीन; तुझ्या सर्व अद्भुत कृतींचे वर्णन करीन. 2 मी तुझ्या ठायी हर्ष व उल्लास पावेन; हे परात्परा, मी तुझ्या नावाचे स्तवन गाईन. 3 माझे वैरी मागे फिरले की ठोकर खातात, तुला पाहून नाश पावतात; 4 कारण तू माझा कैवार घेऊन न्याय केला आहेस; तू यथार्थ न्याय करीत राजासनावर बसला आहेस. 5 तू राष्ट्रांना धमकावले आहेस; दुर्जनांचा तू नाश केला आहेस; तू त्यांचे नाव सदासर्वकाळासाठी पुसून टाकले आहेस. 6 वैर्यांचा समूळ नाश झाला आहे, त्यांचा कायमचा नायनाट झाला आहे; जी शहरे तू उजाड केली त्यांची आठवणदेखील नाहीशी झाली आहे. 7 परमेश्वर तर सर्वकाळ राजासनारूढ आहे; त्याने न्याय करण्याकरता आपले आसन स्थापले आहे. 8 तोच जगाचा यथार्थ न्याय करील; तो लोकांना खरा न्याय देईल. 9 परमेश्वर पीडितांसाठी उच्च दुर्ग आहे; तो संकटसमयी उच्च दुर्ग आहे; 10 ज्यांना तुझ्या नावाची ओळख झालेली आहे ते तुझ्यावर भाव ठेवतील, कारण, हे परमेश्वरा, जे तुझा शोध करतात त्यांना तू टाकले नाहीस. 11 सीयोननिवासी परमेश्वराचे स्तवन करा, त्याची कृत्ये राष्ट्राराष्ट्रांत विदित करा; 12 कारण रक्तपाताचा सूड उगवणार्यास त्यांची आठवण आहे; तो दीनांचा आक्रोश विसरला नाही. 13 हे परमेश्वरा, माझ्यावर दया कर, मला मृत्युद्वारातून उठवणार्या, माझा द्वेष करणार्यांपासून मला झालेली पीडा पाहा; 14 मग मी तुझी सारी कीर्ती वर्णीन; तू केलेल्या उद्धाराबद्दल मी सीयोनकन्येच्या द्वारांसमोर हर्ष करीन. 15 राष्ट्रे आपण केलेल्या खाचेत स्वतःच पडली आहेत; त्यांनी गुप्तपणे मांडलेल्या जाळ्यात त्यांचेच पाय गुंतले आहेत. 16 परमेश्वराने न्यायनिवाडा करून स्वतःला प्रकट केले आहे; दुर्जनास त्याच्याच हातच्या पाशात त्याने गुंतवले आहे. (हिग्गायोन सेला)1 17 देवाला विसरणारी सर्व राष्ट्रे म्हणजे दुर्जन अधोलोकात परत जातील. 18 कंगालांचे नेहमीच विस्मरण होणार नाही, दीनांच्या आशेचा भंग सर्वदा होणार नाही. 19 हे परमेश्वरा, ऊठ, मर्त्य मानवास प्रबळ होऊ देऊ नकोस; राष्ट्रांचा न्यायनिवाडा, तुझ्यापुढे होऊ दे. 20 हे परमेश्वरा, त्यांना दहशत घाल; आपण केवळ मर्त्य आहोत असे राष्ट्रांना कळू दे. (सेला) |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India