Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

स्तोत्रसंहिता 89 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


देवाचा दाविदाशी करार
एज्राही एथान ह्याचे मस्कील (बोधपर स्तोत्र).

1 परमेश्वराच्या दयेविषयी मी नित्य गीत गाईन; मी आपल्या मुखाने पिढ्यानपिढ्यांना तुझी सत्यता कळवीन.

2 कारण मी म्हणालो, तुझ्या दयेची उभारणी सदोदित राहील; स्वर्गात तुझी सत्यता तूच स्थापली आहेस.

3 “मी आपल्या निवडलेल्या पुरुषाशी करार केला आहे; मी आपला सेवक दावीद ह्याच्याशी शपथ वाहिली आहे :

4 ‘मी तुझ्या संततीची परंपरा सर्वकाळ चालवीन, तुझे राजासन सर्व पिढ्यांसाठी स्थिर स्थापीन;” (सेला)

5 हे परमेश्वरा, तुझ्या अद्भुत कृतींची स्तुती आकाश करील; तुझ्या सत्यतेची स्तुती पवित्र जनांच्या मंडळीत होईल.

6 कारण परमेश्वराशी तुलना करता येईल असा आकाशात कोण आहे? देवदूतांमध्ये परमेश्वरासमान कोण आहे?

7 पवित्र जनांच्या सभेत भीती बाळगण्यास योग्य असा देव तो आहे; त्याच्या सभोवतालच्या सर्वांपेक्षा तो भीतिप्रद आहे.

8 हे सेनाधीश देवा, परमेश्वरा, हे परमेशा, तुझ्यासारखा समर्थ कोण आहे? तुझी सत्यता तुझ्याभोवती आहे.

9 समुद्राच्या खळबळाटावर तू अधिकार चालवतोस; तो उचंबळतो तेव्हा त्याच्या लाटा तू शांत करतोस.

10 तू राहाबाला1 ठेचून ठार केले आहेस; तू आपल्या बाहुबलाने आपल्या शत्रूंची दाणादाण केली आहेस.

11 आकाश तुझे आहे, पृथ्वीही तुझी आहे; जग व त्यातले सर्वकाही तूच स्थापले आहेस.

12 उत्तर व दक्षिण ह्या तू उत्पन्न केल्यास; ताबोर व हर्मोन तुझ्या नावाचा जयजयकार करतात.

13 तुझा भुज पराक्रमी आहे; तुझा हात बळकट आहे, तुझा उजवा हात उभारलेला आहे.

14 नीती व न्याय ही तुझ्या राजासनाचा पाया आहेत; दया व सत्य तुझे सेवक आहेत.

15 ज्या लोकांना उत्साहशब्दाचा परिचय आहे ते धन्य! हे परमेश्वरा, ते तुझ्या मुखप्रकाशात चालतात.

16 ते तुझ्या नावामुळे नेहमी उल्लास करतात; तुझ्या न्यायपरायणतेने त्यांची उन्नती होते.

17 कारण त्यांच्या बलाचे वैभव तू आहेस; तुझ्या प्रसादाने आमचा उत्कर्ष होत राहील.2

18 आमची ढाल परमेश्वराच्या मालकीची आहे; आमचा राजाही इस्राएलाच्या पवित्र प्रभूचा आहे.

19 पूर्वी तू आपल्या भक्तांशी दृष्टान्ताने बोललास; तू म्हणालास, “मी एका वीराकडे साहाय्य करण्याचे सोपवले आहे; लोकांतून निवडलेल्या एकाला मी श्रेष्ठ पदास चढवले आहे.

20 माझा सेवक दावीद मला मिळाला आहे; मी आपल्या पवित्र तेलाने त्याला अभिषेक केला आहे.

21 त्याच्याबरोबर माझा हात सदा राहील. माझा भुजही त्याला बलवान करील.

22 शत्रू त्याला छळणार नाहीत; दुष्ट जन त्याला पीडा देणार नाहीत.

23 मी त्याच्यादेखत त्याच्या शत्रूंना मारून चीत करीन. त्याच्या द्वेष्ट्यांना मारून टाकीन.

24 माझी सत्यता व माझी दया त्याच्यासोबत राहतील; माझ्या नावाने त्याचा उत्कर्ष होईल3

25 मी त्याचा हात समुद्रावर, आणि त्याचा उजवा हात नद्यांवर ठेवीन.

26 तो माझा धावा करून म्हणेल, ‘तू माझा पिता, माझा देव, माझा तारणाचा दुर्ग आहेस.

27 मी तर त्याला ज्येष्ठ करीन. पृथ्वीवरील राजांत त्याला सर्वश्रेष्ठ करीन.

28 मी आपली दया त्याच्यावर सर्वकाळ कायम राखीन, त्याच्याशी केलेला माझा करार अढळ राहील.

29 त्याची संतती सर्वकाळ राहील, व त्याचे राजासन स्वर्गाच्या दिवसांप्रमाणे अक्षय राहील असे करीन.

30 जर त्याच्या वंशजांनी माझे नियमशास्त्र सोडले, माझ्या निर्णयाप्रमाणे ते चालले नाहीत,

31 जर माझे नियम त्यांनी मोडले, माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत,

32 तर मी त्यांच्या अपराधाचे शासन दंडाने करीन, त्यांच्या अनीतीचे शासन फटक्यांनी करीन;

33 तरी त्याच्यावरील माझी दया मी दूर करणार नाही, मी आपल्या सत्यवचनाचा भंग करणार नाही;

34 मी आपला करार मोडणार नाही; माझ्या मुखातून जे निघाले ते मी बदलणार नाही.

35 एकवार मी आपल्या पवित्रतेची शपथ वाहिली आहे की, मी दाविदाला कदापि दगा देणार नाही;

36 त्याची संतती सर्वकाळ राहील, व त्याचे राजासन माझ्यासमोर सूर्याप्रमाणे कायम राहील;

37 चंद्राप्रमाणे ते सर्वकाळ टिकेल; आकाशांतील साक्षीदार विश्वसनीय आहे.” (सेला)

38 तरीपण तू आपल्या अभिषिक्ताचा त्याग केलास, त्याचा अव्हेर केलास, त्याच्यावर संतप्त झालास.

39 तू आपल्या सेवकाशी केलेला करार अवमानला आहेस, त्याचा मुकुट भूमीवर टाकून भ्रष्ट केला आहेस.

40 तू त्याचे सर्व तट मोडून टाकले आहेत त्याच्या गढ्या जमीनदोस्त केल्या आहेत.

41 सर्व येणारेजाणारे त्याला लुटतात; तो आपल्या शेजार्‍यापाजार्‍यांना निंदेचा विषय झाला आहे.

42 त्याच्या शत्रूंचा उजवा हात तू उंच केला आहेस; तू त्याच्या सर्व वैर्‍यांना हर्षवले आहेस.

43 तू त्याच्या तलवारीची धार बोथट केली आहेस. लढाईत त्याला टिकाव धरू दिला नाहीस.

44 तू त्याला निस्तेज केले आहेस, त्याचे राजासन तू जमीनदोस्त केले आहेस.

45 त्याच्या तरुणपणाचे दिवस तू खुंटवले आहेस तू त्याला लज्जेने वेष्टले आहेस. (सेला)

46 हे परमेश्वरा, हे कोठवर चालणार? तू सर्वकाळ लपून राहणार काय? तुझा संताप अग्नीसारखा कोठवर भडकत राहणार?

47 माझे आयुष्य किती अल्प आहे ह्याची आठवण कर; तू सर्व मानवजात निर्माण केलीस ती व्यर्थच काय?

48 असा कोण मनुष्य आहे की, तो जिवंतच राहील, मृत्यू पावणार नाही? अधोलोकाच्या कबजातून आपला जीव कोण सोडवील? (सेला)

49 हे प्रभू, ज्यांविषयी तू दाविदाशी आपल्या सत्यतेने शपथ वाहिलीस, ती तुझी पूर्वीची दयेची कृत्ये कोठे आहेत?

50 हे प्रभू, तुझ्या सेवकाची निंदा होत आहे, सर्व थोर राष्ट्रांनी केलेली माझी निंदा मी हृदयात कशी वागवत आहे, ह्याची आठवण कर.

51 हे परमेश्वरा, हे तुझे शत्रू निंदा करतात, पदोपदी तुझ्या अभिषिक्ताची निंदा करतात.

52 परमेश्वर सदासर्वकाळ धन्यवादित असो. आमेन, आमेन.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan