स्तोत्रसंहिता 85 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)देवाने इस्राएलावर दया करावी म्हणून प्रार्थना मुख्य गवयासाठी; कोरहपुत्रांचे स्तोत्र. 1 हे परमेश्वरा, तू आपल्या देशावर प्रसन्न झाला आहेस; तू याकोबाला बंदिवासातून परत आणले आहेस. 2 तू आपल्या लोकांच्या अनीतीची क्षमा केली आहेस, त्यांच्या सर्व पापांवर पांघरूण घातले आहेस. (सेला) 3 तू आपला सर्व क्रोध आवरला आहेस; तू आपल्या कोपाची तीव्रता सोडून दिली आहेस. 4 हे आमच्या उद्धारक देवा, आम्हांला परत आण; आणि आमच्यावरील आपला रोष नाहीसा कर. 5 तू आमच्यावर सर्वकाळ कोपलेला राहणार काय? पिढ्यानपिढ्या तू आपला क्रोध चालू ठेवणार काय? 6 तुझ्या लोकांनी तुझ्या ठायी हर्ष पावावा म्हणून तू आमचे पुनरुज्जीवन करणार नाहीस काय? 7 हे परमेश्वरा, तुझ्या दयेचा आम्हांला अनुभव येऊ दे, व तू सिद्ध केलेले तारण आम्हांला दे. 8 परमेश्वर देव जे काही बोलेल ते मी ऐकून घेईन; कारण तो आपल्या लोकांशी व आपल्या भक्तांशी क्षेमकुशलाचे भाषण करील; मात्र त्यांनी मूर्खपणाकडे पुन्हा वळू नये. 9 खरोखर त्याचे भय धरणार्यांना त्याने सिद्ध केलेले तारण समीप असते; ह्यासाठी की आमच्या देशात वैभव नांदावे. 10 दया व सत्य ही एकत्र झाली आहेत; नीती व शांती ह्यांनी एकमेकींचे चुंबन घेतले आहे; 11 पृथ्वीतून सत्य बाहेर पडत आहे; स्वर्गातून नीतिमत्त्व अवलोकन करीत आहे. 12 जे उत्तम ते परमेश्वर देईल; आणि आमची भूमी आपले फळ देईल. 13 त्याच्यापुढे नीतिमत्त्व चालेल व त्याची पावले इतरांना मार्गदर्शक होतील. |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India