स्तोत्रसंहिता 84 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)देवाच्या निवासस्थानासाठी तळमळ मुख्य गवयासाठी; गित्ती चालीवर गायचे कोरहपुत्रांचे स्तोत्र. 1 हे सेनाधीश परमेश्वरा, तुझी निवासस्थाने किती रम्य आहेत! 2 माझ्या जिवाला परमेश्वराच्या अंगणाची उत्कंठा लागली असून तो झुरत आहे; माझा जीव व देह जिवंत देवाला हर्षाने आरोळी मारीत आहेत. 3 हे सेनाधीश परमेश्वरा, माझ्या राजा, माझ्या देवा, तुझ्या वेद्यांजवळ चिमणीला घरटे करण्यास आणि निळवीला आपल्या पिलांसाठी कोटे बांधण्यास स्थळ मिळाले आहे. 4 तुझ्या घरात राहणार्यांची केवढी धन्यता! ते निरंतर तुझी स्तुती करीत राहतील. (सेला) 5 ज्या मनुष्याला तुझ्यापासून सामर्थ्य प्राप्त होते, ज्याच्या मनाला सीयोनेच्या राजमार्गांचा ध्यास लागला आहे तो केवढा धन्य! 6 शोकजनक1 खोर्यातून जाताना ते त्यांना झर्यांचे स्थानच वाटते; आगोटीचा पाऊसही त्याची आबादानी करतो. 7 ते अधिकाधिक शक्ती पावत जातात, सीयोनेत प्रत्येकाला देवाचे दर्शन लाभते. 8 हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, माझी प्रार्थना ऐक; हे याकोबाच्या देवा, कान दे. (सेला) 9 हे देवा, तू आमची ढाल आहेस; अवलोकन कर, तू आपल्या अभिषिक्ताच्या मुखाकडे दृष्टी लाव. 10 खरोखर तुझ्या अंगणातील एक दिवस हा सहस्र दिवसांपेक्षा उत्तम आहे; दुष्टाईच्या तंबूत राहण्यापेक्षा माझ्या देवाच्या घराचा द्वारपाळ होणे2 मला इष्ट वाटते. 11 कारण परमेश्वर देव हा सूर्य व ढाल आहे, परमेश्वर अनुग्रह व गौरव देतो; जे सात्त्विकपणे चालतात त्यांना उत्तम ते दिल्यावाचून तो राहणार नाही. 12 हे सेनाधीश परमेश्वरा, जो मनुष्य तुझ्यावर भाव ठेवतो तो कितीतरी धन्य! |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India