स्तोत्रसंहिता 81 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)देवाचा चांगुलपणा व इस्राएलाचा बंडखोरपणा मुख्य गवयासाठी; गित्ती चालीवर गायचे आसाफाचे स्तोत्र. 1 देव जो आमचे सामर्थ्य, त्याचे मोठ्याने गुणगान करा; याकोबाच्या देवाचा जयजयकार करा. 2 सुरावर गीत म्हणा, आणि खंजिरी वाजवा; मंजुळ वीणा व सतार वाजवा. 3 शुक्ल प्रतिपदेस, पौर्णिमेस, आमच्या सणाच्या दिवशी कर्णा वाजवा. 4 कारण हा इस्राएलासाठी नियम आहे; हा याकोबाच्या देवाचा निर्बंध आहे. 5 तो मिसर देशावरून गेला, तेव्हा त्याने योसेफवंशात हाच निर्बंध साक्षीसाठी नेमला; ज्याला मी ओळखले नव्हते त्याचे भाषण मी ऐकले; ते असे की, 6 “मी त्याच्या खांद्यावरील भार काढला आहे; त्याच्या हातांतला हारा दूर केला आहे. 7 तू संकटात असता आरोळी केली तेव्हा मी तुला सोडवले; मी तुला मेघगर्जनेच्या गुप्त स्थलातून उत्तर दिले; मरीबाच्या जलांजवळ मी तुला पारखले. (सेला) 8 अहो माझ्या लोकांनो, ऐका, मी तुम्हांला बोध करतो; हे इस्राएला, तू माझे ऐकशील तर बरे होईल! 9 तुला अन्य देव नसावा, तू परक्या देवाच्या पाया पडू नये. 10 मीच तुझा देव परमेश्वर आहे, मीच तुला मिसर देशातून बाहेर काढले, तू आपले तोंड चांगले उघड म्हणजे मी ते भरीन; 11 परंतु माझ्या लोकांनी माझी वाणी ऐकली नाही; इस्राएलाने माझे ऐकले नाही. 12 ह्यामुळे मी त्यांना त्यांच्या हृदयाच्या दुराग्रहाप्रमाणे वागू दिले; ते आपल्याच संकल्पाप्रमाणे चालले. 13 माझे लोक माझे ऐकतील, इस्राएल माझ्या मार्गांनी चालेल, तर बरे होईल! 14 मी तेव्हाच त्यांच्या वैर्यांचा मोड करीन, त्यांच्या शत्रूंवर मी आपला हात चालवीन; 15 परमेश्वराचे द्वेष्टे त्याला वश होतील, आणि ते सतत धाकात राहतील2 16 मी त्याला गव्हाचे सत्त्व खाऊ घालीन आणि पहाडातल्या मधाने मी तुला तृप्त करीन.” |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India