Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

स्तोत्रसंहिता 78 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


एकनिष्ठपणे न वागणार्‍यावरही देवाची कृपा
आसाफाचे मस्कील (बोधपर स्तोत्र).

1 अहो माझ्या लोकांनो, माझ्या उपदेशाकडे लक्ष द्या, माझ्या तोंडच्या वचनाकडे कान लावा.

2 मी आपले तोंड उघडून दाखले सांगेन; प्राचीन काळच्या गूढ गोष्टींचे निवेदन करीन.

3 ज्या आम्ही ऐकल्या, ज्या आम्हांला समजल्या, आमच्या वडिलांनी ज्या आम्हांला सांगितल्या,

4 त्या गोष्टी आम्ही त्यांच्या वंशजांपासून गुप्त ठेवणार नाही; तर परमेश्वराची स्तुत्य कृत्ये, त्याचा पराक्रम आणि त्याने केलेली अद्भुत कृत्ये पुढच्या पिढीला सांगू.

5 त्याने याकोबासाठी निर्बंध स्थापले, त्याने इस्राएलासाठी नियमशास्त्र केले. त्याने आमच्या वडिलांना आज्ञा केली की, त्यांनी ते आपल्या वंशजांना शिकवावे,

6 आणि पुढच्या पिढीने, म्हणजे पुढे जन्मास येणार्‍या संततीने ह्या गोष्टी जाणाव्या; त्या आपल्या मुलांना कथन करण्यास त्यांनी उद्युक्त व्हावे.

7 त्यांनी देवावर भाव ठेवावा, देवाची कृत्ये विसरू नयेत, तर त्याच्या आज्ञा पाळाव्यात;

8 आणि त्यांनी आपल्या पूर्वजांसारखी हट्टी व बंडखोर स्वभावाची पिढी, आपले अंतःकरण नीट न राखणारी व देवाशी एकनिष्ठ नसणारी पिढी होऊ नये.

9 एफ्राइमाचे वंशज सशस्त्र व धनुर्धारी असूनही त्यांनी लढाईच्या वेळी पाठ फिरवली.

10 त्यांनी देवाचा करार पाळला नाही; त्याच्या नियमशास्त्राप्रमाणे चालण्यास ते कबूल नव्हते;

11 आणि त्याने केलेली कृत्ये व त्याने त्यांना दाखवलेली अद्भुत कृत्ये ते विसरले.

12 मिसर देशात सोअनाच्या पटांगणावर त्यांच्या वडिलांसमक्ष त्याने अद्भुत कृत्ये केली.

13 त्याने समुद्र दुभागून त्यातून त्यांना पार नेले; त्याने पाणी राशीसारखे उभे केले.

14 दिवसा मेघ व रात्रभर अग्निप्रकाश ह्यांच्या योगे तो त्यांना नेत असे.

15 त्याने रानात खडक फोडून खोल जलाशयाप्रमाणे भरपूर पाणी त्यांना पिण्यास दिले.

16 त्याने खडकातून पाण्याचे झरेही काढले, नद्यांप्रमाणे पाणी वाहवले.

17 तथापि ते त्याच्याविरुद्ध अधिकाधिक पातक करू लागले, परात्पराविरुद्ध रुक्ष अरण्यात त्यांनी बंड केले.

18 त्यांनी आपली इच्छा तृप्त करण्यासाठी अन्न मागून आपल्या मनात देवाची परीक्षा पाहिली.

19 ते देवाविरुद्ध बोलले; ते म्हणाले, “रानात भोजनाची सिद्धता करण्यास देव समर्थ आहे काय?

20 पाहा, त्याने खडकावर टोला मारला तेव्हा पाणी उसळून वाहू लागले, व त्याचे लोट चालले; तो भाकरही देण्यास समर्थ आहे काय? तो आपल्या लोकांना मांस पुरवील काय?”

21 हे ऐकून परमेश्वर कोपला आणि याकोबावर त्याचा अग्नी पेटला; इस्राएलावर त्याचा क्रोध भडकला.

22 कारण त्यांनी देवावर विश्वास ठेवला नाही, आणि त्याने सिद्ध केलेल्या तारणावर भरवसा ठेवला नाही.

23 तरी त्याने वरती आभाळांस आज्ञा केली, व आकाशद्वारे उघडली.

24 खाण्यासाठी त्याने त्यांच्यावर मान्न्याचा वर्षाव केला; आणि त्यांना स्वर्गातले धान्य दिले.

25 दिव्यदूतांची भाकर मानवांनी खाल्ली; पुरून उरेल इतके अन्न त्याने त्यांना दिले.

26 त्याने पूर्वेचा वारा आकाशात वाहवला, आणि आपल्या सामर्थ्याने दक्षिणेचा वारा आणला.

27 त्याने त्यांच्यावर धुळीसारखा मांसाचा आणि समुद्राच्या वाळूसारखा पक्ष्यांचा वर्षाव केला;

28 त्याने त्यांच्या छावणीमध्ये, त्यांच्या वस्तीभोवती ते पाडले.

29 ते खाऊन ते अगदी तृप्त झाले; अशा रीतीने त्यांची इच्छा त्याने पुरवली.

30 त्यांची इच्छा पुरी झाली नव्हती, अजून त्यांच्या तोंडी अन्नाचा घास होता,

31 तोच त्यांच्यावर देवाचा कोप भडकला, आणि त्याने त्यांच्यातल्या धष्टपुष्टांस मारून टाकले, इस्राएलाच्या तरुणांना ठोकून खाली पाडले,

32 इतके सर्व झाले तरी ते पाप करीतच राहिले, व त्याच्या अद्भुत कृत्यांवर त्यांनी विश्वास ठेवला नाही.

33 ह्यामुळे त्याने त्यांचे दिवस वाफेसारखे नाहीसे केले व त्यांची वर्षे घोर भयात संपवली.

34 तो त्यांचा वध करू लागला तेव्हा ते त्याचा शोध करू लागले; ते देवाकडे वळून अनन्यभावे त्याला शरण गेले.

35 देव आमचा दुर्ग आहे, परात्पर देव आम्हांला मुक्त करणारा आहे, ह्याची आठवण त्यांना झाली.

36 त्यांनी आपल्या मुखाने त्याच्याशी कपट केले, आणि आपल्या जिभेने त्याच्याशी लबाडी केली.

37 कारण त्यांचे मन त्याच्या ठायी स्थिर नव्हते, शिवाय त्याचा करार त्यांनी इमानाने पाळला नाही.

38 पण तो कनवाळू असल्यामुळे त्यांच्या अपराधाची क्षमा करीत असतो, तो नाश करीत नाही; तो आपला कोप वारंवार आवरतो, आपला सगळा संताप भडकू देत नाही.

39 ते नश्वर आहेत, वार्‍याची झुळूक निघून जाते आणि परत येत नाही तसे ते आहेत, ह्याची त्याने आठवण केली.

40 कितीतरी वेळा त्यांनी रानात त्याच्याविरुद्ध बंडाळी केली! कितीतरी वेळा त्यांनी अरण्यात त्याला दुःख दिले!

41 पुनःपुन्हा त्यांनी देवाची परीक्षा पाहिली, व इस्राएलाच्या पवित्र प्रभूला चिडवले.

42 त्याच्या प्रतापी हस्ताचे त्यांना स्मरण झाले नाही; त्याने त्यांना शत्रूंपासून सोडवले,

43 त्याने मिसर देशात आपली चिन्हे, सोअनाच्या पटांगणावर आपली अद्भुत कृत्ये दाखवली, तो दिवस त्यांनी आठवला नाही.

44 त्याने त्यांच्या नद्यांच्या पाण्याचे रक्त केले, म्हणून त्यांचे वाहते पाणी त्यांच्याने पिववेना.

45 त्याने त्यांच्यावर माश्यांचे थवेच्या थवे पाठवले; त्या माश्यांनी त्यांना ग्रासून टाकले; त्याने बेडूक पाठवले, त्या बेडकांनी त्यांचे सर्वकाही नासून टाकले.

46 त्याने त्यांच्या शेतातल्या उत्पन्नावर सुरवंट व त्यांच्या श्रमफलावर टोळ पडू दिले.

47 त्याने गारांनी त्याच्या द्राक्षवेलांचा व बर्फाने त्यांच्या उंबराच्या झाडांचा नाश केला.

48 त्याने त्यांची गुरेढोरे गारांच्या, व जनावरे विजांच्या हवाली केली.

49 त्याने त्यांच्यावर आपला कोपाग्नी, क्रोध, रोष व संकट ह्या अनिष्टकारक दूतांची स्वारी सोडली.

50 त्याने आपल्या कोपासाठी मार्ग सिद्ध केला; त्याने त्यांचा जीव मृत्यूपासून वाचवला नाही, तर त्यांचा प्राण मरीच्या हवाली केला.

51 त्याने मिसर देशातले प्रथमजन्मलेले सर्व, हामाच्या डेर्‍यातले त्यांच्या पौरुषाचे प्रथमफल ह्यांना मारले;

52 पण त्याने आपल्या लोकांना मेंढरांसारखे बाहेर आणून त्यांना कळपाप्रमाणे रानातून नेले.

53 त्याने त्यांना सुखरूप नेले, ते भ्याले नाहीत, त्यांच्या शत्रूंना तर समुद्राने बुडवून टाकले.

54 त्याने त्यांना आपल्या पवित्र प्रदेशाकडे, आपल्या उजव्या हाताने मिळवलेल्या डोंगराकडे आणले.

55 त्याने त्यांच्यापुढून राष्ट्रे हाकून लावली, त्यांच्या राहण्याच्या जागा सूत्राने मापून त्यांना वतन म्हणून वाटून दिल्या, आणि त्यांच्या तंबूंत इस्राएलाचे वंश वसवले.

56 तरी त्यांनी परात्पर देवाची परीक्षा पाहिली व त्याच्याविरुद्ध बंड केले, व त्याचे निर्बंध पाळले नाहीत,

57 तर आपल्या पूर्वजांप्रमाणे त्याच्याकडे पाठ करून ते फितूर झाले; फसव्या धनुष्यासारखे ते भलतीकडे वळले.

58 त्यांनी आपल्या उच्च स्थानांमुळे त्याला राग आणला; आपल्या कोरीव मूर्तींमुळे त्याला ईर्ष्या आणली.

59 हे ऐकून देव कोपला आणि इस्राएलास अगदी कंटाळला;

60 त्याने शिलो येथील निवासमंडप म्हणजे मानवामध्ये उभारलेला आपला डेरा सोडून दिला;

61 त्याने आपल्या बलाचा पाडाव होऊ दिला, व आपले वैभव शत्रूच्या हाती पडू दिले.

62 त्याने आपले लोक तलवारीच्या हवाली केले; आपल्या वतनावर तो रुष्ट झाला.

63 अग्नीने त्यांचे कुमार खाऊन टाकले; त्यांच्या कुमारींना लग्नगीते लाभली नाहीत.

64 त्यांचे याजक तलवारीने पडले, व त्यांच्या विधवा रडल्या नाहीत.

65 तेव्हा प्रभू झोपेतून जागा झालेल्या मनुष्यासारखा उठला. द्राक्षारस पिऊन आरोळी मारणार्‍या वीरासारखा उठला.

66 त्याने आपल्या शत्रूंना मारून मागे हटवले; त्यांची कायमची अप्रतिष्ठा केली.

67 त्याने योसेफाचा डेरा वर्ज्य केला, एफ्राइमाचा वंश पसंत केला नाही;

68 तर यहूदाचा वंश त्याने पसंत केला; आपणाला प्रिय जो सीयोन डोंगर तो त्याने पसंत केला.

69 उंच आकाशासारखे व आपण चिरकाल स्थापलेल्या पृथ्वीसारखे त्याने आपले पवित्रस्थान बांधले.

70 त्याने आपला सेवक दावीद ह्याला निवडले; त्याला त्याने मेंढरांच्या कोंडवाड्यातून घेतले;

71 आपली प्रजा म्हणजे याकोबवंश, आपले वतन म्हणजे इस्राएलवंश ह्यांचे पालन करण्यास दुभत्या मेंढ्यांमागे तो होता तेथून त्याने त्यांना आणले.

72 आणि त्याने आपल्या मनाच्या सरळतेने त्यांचे पालन केले, आपल्या हाताच्या चातुर्याने त्यांना मार्ग दाखवला.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan