Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

स्तोत्रसंहिता 74 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


देवाच्या प्रजेच्या शत्रूंविषयी गार्‍हाणे
आसाफाचे मस्कील (बोधपर स्तोत्र).

1 हे देवा, तू आम्हांला कायमचे का टाकले आहेस? आपल्या कुरणातल्या कळपावर तुझा कोपाग्नी का धुमसतो?

2 जी मंडळी पुरातन काळी तू विकत घेतलीस, जिला तू आपले वारस होण्याकरता खंडणी भरून सोडवलेस तिचे, व ज्या सीयोन पर्वतावर तू वस्ती केली त्याचे स्मरण कर.

3 सर्वस्वी उद्ध्वस्त झालेल्या स्थलाकडे पाय उचलून चल; वैर्‍याने पवित्रस्थानाची अगदी नासाडी केली आहे.

4 तुझ्या सभागृहात तुझ्या शत्रूंनी हलकल्लोळ मांडला आहे; त्यांनी आपले ध्वज चिन्हांसाठी उभारले आहेत.

5 दाट झाडीवर कुर्‍हाड उचलणार्‍या लोकांसारखे ते दिसले.

6 त्यांचे एकंदर नक्षीकाम ते कुर्‍हाडीने व हातोड्याने फोडून टाकतात.

7 त्यांनी तुझ्या पवित्रस्थानाला आग लावली आहे; तुझ्या नावाचे निवासस्थान भ्रष्ट करून अगदी धुळीस मिळवले आहे.

8 ते आपल्या मनाशी म्हणाले, “आपण ह्यांचा नायनाट करून टाकू;” त्यांनी देशात असलेली देवाची सर्व सभास्थाने जाळून टाकली आहेत.

9 आमची चिन्हे आमच्या दृष्टीस पडत नाहीत; कोणी संदेष्टा उरला नाही; असे कोठवर चालेल हे जाणणारा आमच्यामध्ये कोणी नाही.

10 हे देवा, शत्रू कोठवर निंदा करणार? वैरी तुझ्या नावाची निर्भर्त्सना सदा करणार काय?

11 तू आपला हात, म्हणजे आपला उजवा हात, का आवरून धरतोस? तो आपल्या छातीवरून काढून तू त्याचा संहार कर.

12 तरी देव पुरातन कालापासून माझा राजा आहे; पृथ्वीवर उद्धार करणारा तो आहे.

13 तू आपल्या सामर्थ्याने समुद्र दुभागलास; जलाशयातील मगरींची मस्तके तू ठेचून टाकलीस.

14 तू लिव्याथानाच्या मस्तकांचा चुराडा केलास, ओसाड प्रदेशातील प्राण्यांना तो तू खाऊ घातलास.

15 तू झरा खोदून जलप्रवाह बाहेर काढलास; तू निरंतर वाहणार्‍या नद्या सुकवून टाकल्यास.

16 दिवस तुझा आहे, रात्रही तुझी आहे; चंद्र व सूर्य तूच स्थापन केले.

17 पृथ्वीच्या सर्व सीमा तूच ठरवल्यास. उन्हाळा व हिवाळा हे तूच केलेस.

18 हे परमेश्वरा, वैर्‍याने कशी विटंबना मांडली आहे, मूर्ख राष्ट्राने तुझ्या नावाची कशी निंदा चालवली आहे हे लक्षात असू दे.

19 तू आपल्या कबुतराला श्वापदापुढे टाकू नकोस; आपल्या दीन जनांच्या प्राणांचा विसर कायमचा पडू देऊ नकोस.

20 तू कराराकडे लक्ष दे; कारण देशाचे कोनेकोपरे केवळ जुलमाची वसतिस्थाने झाली आहेत.

21 पीडितांना लज्जित होऊन मागे फिरू देऊ नकोस; दीन व दरिद्री तुझ्या नावाची स्तुती करोत.

22 हे देवा, ऊठ, तू स्वतःच आपला वाद चालव; मूर्ख तुझी निंदा कशी नित्य करीत आहे हे लक्षात आण.

23 शत्रूंची आरडाओरड, तुझ्याविरुद्ध उठणार्‍यांचा गोंगाट एकसारखा वर तुझ्यापर्यंत पोचत आहे तो विसरू नकोस.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan