Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

स्तोत्रसंहिता 69 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


संकटसमयी केलेली आरोळी
मुख्य गवयासाठी; शोशन्नीम (भूकमले) ह्या चालीवर गायचे दाविदाचे स्तोत्र.

1 हे देवा, मला वाचव; कारण पाणी माझ्या गळ्याशी येऊन भिडले आहे.

2 मी खोल दलदलीत रुतलो आहे, तेथे उभे राहण्यास आधार नाही; मी खोल पाण्यात आलो आहे, आणि लोंढा माझ्यावरून जात आहे.

3 आरोळी मारता मारता मी थकलो आहे; माझा घसा कोरडा पडला आहे; आपल्या देवाची वाट पाहता पाहता माझे डोळे शिणले आहेत.

4 विनाकारण माझा द्वेष करणारे माझ्या डोक्याच्या केसांपेक्षा अधिक आहेत; अन्यायाने माझ्याशी वैर करणारे, माझा जीव घेऊ पाहणारे, बलिष्ठ आहेत; मी हरण केले नव्हते तेही मला द्यावे लागले.

5 हे देवा, तू माझे मूर्खपण जाणतोस; आणि तुझ्यापुढे माझी पातके लपलेली नाहीत.

6 हे प्रभू, सेनाधीश परमेश्वरा, जे तुझी प्रतीक्षा करतात त्यांच्या फजितीला मी कारण होऊ नये; हे इस्राएलाच्या देवा, जे तुझा शोध करतात त्यांच्या अप्रतिष्ठेला मी कारण होऊ नये.

7 कारण तुझ्यासाठी मी निंदा सोसली आहे; लज्जेने माझे मुख व्याप्त झाले आहे;

8 मी आपल्या भावांना नवखा, माझ्या सहोदरांना परका असा झालो आहे.

9 कारण तुझ्या मंदिराविषयीच्या आवेशाने मला ग्रासून टाकले आहे, निंदा करणार्‍यांनी केलेली तुझी निंदा माझी निंदा झाली आहे.

10 मी उपास करून शोक केला, तेच माझ्या निंदेस कारण झाले.

11 मी गोणपाटाचे कपडे चढवले, तेव्हा मी त्यांच्या उपहासाचा विषय झालो.

12 वेशीत बसणारे माझ्याविषयी बोलत असतात, मी मद्यपी लोकांच्या गीतांचा विषय झालो.

13 मी तर, हे परमेश्वरा, तुला मान्य होईल अशा समयी तुझी प्रार्थना करतो; हे देवा, तू आपल्या विपुल दयेस अनुसरून व आपण सिद्ध केलेल्या उद्धाराच्या सत्यास अनुसरून मला उत्तर दे.

14 चिखलातून मला काढ, मला रुतू देऊ नकोस; मला माझ्या द्वेष्ट्यांपासून मुक्त कर व खोल पाण्यातून मला काढ.

15 पाण्याचा लोंढा माझ्यावरून जाऊ देऊ नकोस; दलदलीत मला खचू देऊ नकोस; गर्तेच्या जाभाडात मला गुंतून पडू देऊ नकोस.

16 हे परमेश्वरा, माझे ऐक, कारण तुझे वात्सल्य उत्तम आहे; आपल्या विपुल करुणेस अनुसरून माझ्याकडे वळ.

17 आपल्या दासापासून तू आपले मुख लपवू नकोस; कारण मी संकटात आहे; माझे सत्वर ऐक;

18 माझ्या जिवाजवळ येऊन त्याचा उद्धार कर; माझे वैरी पाहून माझा उद्धार कर.

19 माझी निंदा, माझी फजिती आणि माझी अप्रतिष्ठा तू जाणतोस; माझे सर्व शत्रू तुझ्यापुढे आहेत.

20 निंदा होत असल्यामुळे माझे हृदय भग्न झाले आहे; मी अगदी बेजार झालो आहे; माझी कीव करणारा कोणी आहे की काय हे मी पाहिले, पण कोणी आढळला नाही; माझे कोणी समाधान करील म्हणून मी वाट पाहिली, पण कोणी आला नाही.

21 त्यांनी मला अन्न म्हणून विष खायला दिले, तहान भागवण्यास मला आंब दिली.

22 त्यांच्यापुढे मांडलेले ताट त्यांना पाश असे होवो, ते निश्‍चिंत असता त्यांना ते जाळे असे होवो.

23 त्यांना दिसेनासे व्हावे म्हणून त्यांच्या डोळ्यांवर अंधारी येवो; तू त्यांची कंबर सदा खचव.

24 तू त्यांच्यावर आपल्या क्रोधाचा मारा कर, तुझा कोपाग्नी त्यांना गाठो.

25 त्यांची वस्ती ओसाड पडो, त्यांच्या डेर्‍यात कोणी न राहो.

26 कारण ज्याला तू शिक्षा केलीस त्याच्या पाठीस ते लागतात; तू ज्यांना घायाळ केले आहेस त्यांच्या दु:खात ते भर घालतात.

27 त्यांच्या अन्यायात भर टाक; तुझ्या न्यायपरायणतेचा लाभ त्यांना न होवो.

28 जीवनाच्या पुस्तकातून त्यांची नावे खोडली जावोत, नीतिमानांबरोबर त्यांची नावनिशी न होवो.

29 मी तर दीन व दुःखी आहे; हे देवा, तू सिद्ध केलेले तारण मला उच्च स्थानी नेऊन ठेवील.

30 गीत गाऊन मी देवाच्या नावाचे स्तवन करीन. त्याचे उपकारस्मरण करून त्याचा महिमा वर्णीन.

31 ते बैलांपेक्षा, शिंगे असलेल्या व दुभागलेल्या खुरांच्या गोर्‍ह्यापेक्षा परमेश्वराला आवडेल.

32 दीन हे पाहून हर्ष करतील. देवाचा शोध करणार्‍यांनो, तुमच्या हृदयात नवजीवन येवो.

33 कारण परमेश्वर दरिद्र्यांचे ऐकतो; बंदीत पडलेल्या आपल्या लोकांना तो तुच्छ मानत नाही.

34 आकाश, पृथ्वी, समुद्र, व त्यांत संचार करणारे सर्व प्राणी त्याचे स्तवन करोत.

35 कारण देव सीयोनेचे तारण करील, तो यहूदाची नगरे बांधील; लोक तेथे राहतील व ते त्यांच्या ताब्यात येईल.

36 ते त्यांच्या दासांच्या संततीचेही वतन होईल; ज्यांना त्याचे नाव प्रिय आहे ते त्यात वस्ती करतील.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan