Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

स्तोत्रसंहिता 68 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


सीयोनेचा व पवित्रस्थानाचा परमेश्वर
मुख्य गवयासाठी; दाविदाचे संगीतस्तोत्र.

1 देवाने उठावे; त्याच्या वैर्‍यांची दाणादाण होवो; त्याचा द्वेष करणारे त्याच्यापुढून पळोत.

2 जसा धूर पांगतो तशी त्यांची पांगापांग कर; जसे मेण अग्नीपुढे ठेवले असता वितळते तसे दुष्ट देवापुढे नष्ट होवोत;

3 परंतु नीतिमान हर्ष करोत, देवापुढे आनंदोत्सव करोत, हर्षामुळे आनंद करोत.

4 देवाला गीत गा, त्याच्या नावाचे स्तवन करा; ज्याची स्वारी ओसाड प्रदेशातून चालली आहे, त्याच्यासाठी राजमार्ग तयार करा; त्याचे नाव परमेश आहे, त्याच्यापुढे आनंदोत्सव करा.

5 पितृहीनांचा पिता, विधवांचा कैवारी असा देव आपल्या पवित्र निवासस्थानी आहे.

6 एकटे असलेल्यांना देव कुटुंबवत्सल करतो; बंदिवानांना बाहेर काढून भाग्यवान करतो; परंतु बंडखोर रुक्ष प्रदेशात राहतात.

7 हे देवा, जेव्हा तू आपल्या लोकांपुढे चाललास व रानातून प्रयाण केलेस, (सेला)

8 तेव्हा भूमी कंपित झाली, व देवासमोर आकाशातून पर्जन्यवृष्टी झाली; देवासमोर, इस्राएलाच्या देवासमोर, सीनाय पर्वतदेखील कंपित झाला.

9 हे देवा, तू विपुल पर्जन्य पाठवून दिलास; तुझे वतन कोमेजले होते तेव्हा तू ते यथास्थित केलेस.

10 त्यात तुझी मंडळी राहिली; हे देवा, तू आपल्या चांगुलपणाने दीनांसाठी बेगमी केलीस.

11 प्रभू अनुज्ञा देतो; मंगलवार्ता प्रसिद्ध करणार्‍या स्त्रियांची मोठी सेना सिद्ध होऊन म्हणते की,

12 “सैन्यांचे राजे पळ काढतात, पळ काढतात;” आणि घरी राहिलेली गृहिणी लूट वाटून देते.

13 तुम्ही मेंढवाड्यामध्ये1 पडून राहता काय? ज्याचे पंख रुप्याने व पिसे पिवळ्या सोन्याने मंडित आहेत, अशा कबुतरासारखे तुम्ही आहात ना?

14 सर्वसमर्थाने राजांची दाणादाण केली, तेव्हा सलमोनावर बर्फ पडते त्याप्रमाणे झाले.

15 हे महान पर्वता, बाशानाच्या पर्वता, अनेक शिखरे असलेल्या पर्वता, बाशानाच्या पर्वता,

16 देवाला निवासासाठी जो पर्वत आवडला, त्याच्याकडे, हे अनेक शिखरांच्या पर्वता, तू वक्रदृष्टीने का पाहतोस? त्याच्यावरच परमेश्वर खरोखर सदोदित राहील.

17 देवाचे रथ वीस हजार आहेत, हजारो हजार आहेत, प्रभू सीनायवरून पवित्रस्थानी आला आहे.

18 तू उच्च स्थानी आरोहण केले आहेस; तू पाडाव केलेल्यांना कैद करून नेले आहेस; मनुष्यांमध्ये, बंडखोरांमध्येही तुला नजराणे मिळाले आहेत, ह्यासाठी की, हे परमेशा, देवा, तू तेथे वास करावास.

19 प्रभू धन्यवादित असो, तो प्रतिदिनी आमचा भार वाहतो; देव आमचे तारण आहे. (सेला)

20 देव आम्हांला संकटांतून मुक्त करणारा देव आहे; आणि मृत्यूपासून सोडवणारा प्रभू परमेश्वर आहे.

21 देव निश्‍चये आपल्या वैर्‍यांचे मस्तक फोडील, जो आपल्या दुष्टाईत निमग्न होऊन चालतो त्याचे केसाळ माथे फोडील.

22 प्रभू म्हणाला, “बाशानापासून मी त्यांना परत आणीन, समुद्राच्या खोल डोहातून त्यांना परत आणीन;

23 ह्यासाठी की तू आपला पाय रक्तात बुचकळावा. तुझे शत्रू तुझ्या कुत्र्यांच्या जिभांचे खाद्य व्हावे.”

24 हे देवा, त्यांनी तुझ्या स्वार्‍या पाहिल्या आहेत, पवित्रस्थानी माझ्या देवाच्या, माझ्या राजाच्या स्वार्‍या त्यांनी पाहिल्या आहेत.

25 खंजिर्‍या वाजवत जाणार्‍या कुमारींच्या मधून गाणारे पुढे व वाजवणारे मागे चालताना म्हणतात की

26 “ज्यांचा उगम इस्राएलापासून आहे असे तुम्ही, प्रभू जो देव त्याचा जनसभांत धन्यवाद करा.”

27 तेथे त्यांच्यावर प्रभुत्व करणारा कनिष्ठ बन्यामीन, यहूदाचे अधिपती, व त्यांच्याबरोबरचे समुदाय जबुलूनाचे अधिपती, नफतालीचे अधिपती हे आहेत.

28 तू प्रबळ व्हावे असे तुझ्या देवाने आज्ञापिले आहे; हे देवा, तू आमच्यासाठी जे केले आहेस ते दृढ कर.

29 यरुशलेमातील तुझ्या मंदिरासाठी राजे तुला भेटी आणतील.

30 लव्हाळ्यामध्ये राहणारे वनपशू, बैलांचा कळप आणि त्यांचे वत्स ह्यांना धमकाव; रुप्याचा लोभ धरणार्‍या लोकांना पायाखाली तुडव. युद्धप्रिय लोकांची त्याने दाणादाण केली आहे.

31 मिसर देशातून सरदार येतील; कूश आपले हात देवाकडे पसरण्याची त्वरा करील.

32 अहो पृथ्वीवरील राष्ट्रांनो, तुम्ही देवाचे गीत गा; प्रभूची स्तोत्रे गा. (सेला)

33 पुरातन आकाशांच्या आकाशावर आरूढ होऊन जो स्वारी करतो, त्याची स्तोत्रे गा; पाहा, तो आपला शब्द, सामर्थ्याचा शब्द, उच्चारतो.

34 देवाच्या बलाचे वर्णन करा; इस्राएलावर त्याचे ऐश्वर्य आणि गगनमंडळात त्याचे बळ आहे.

35 तुझ्या पवित्रस्थानातून कार्य करणारा देव भयप्रद आहे, इस्राएलाचा देव आपल्या लोकांना बल व सामर्थ्य देतो. देव धन्यवादित असो.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan