Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

स्तोत्रसंहिता 66 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


देवाच्या महत्कृत्यांबद्दल उपकारस्तुती
मुख्य गवयासाठी; संगीतस्तोत्र.

1 अहो पृथ्वीवरील सर्व लोकहो, देवाचा जयजयकार करा.

2 त्याच्या नावाचा महिमा गा, त्याची गौरवयुक्त स्तुती करा.

3 देवाला म्हणा, “तुझी कृत्ये किती भयप्रद आहेत, तुझ्या महाबळामुळे तुझे वैरी तुझ्या अधीन होतात.

4 सर्व पृथ्वीवरील लोक तुला नमतील व तुझी स्तोत्रे गातील; तुझ्या नावाची स्तोत्रे गातील.” (सेला)

5 अहो या, देवाची कृत्ये पाहा; तो आपल्या कृतींनी मानवजातीस धाक बसवतो.

6 त्याने समुद्राची कोरडी भूमी केली; ते नदीतून पायी पार गेले, तेव्हा आम्ही त्याच्या ठायी हर्ष पावलो.

7 तो आपल्या सामर्थ्याने सर्वकाळ सत्ता चालवतो, त्याचे नेत्र राष्ट्रांना निरखून पाहतात; बंडखोरांनी आपली मान ताठ करू नये. (सेला)

8 अहो लोकांनो, आमच्या देवाचा धन्यवाद करा, त्याच्या स्तुतीचा घोष ऐकू येईल असा करा;

9 त्यानेच आमच्या प्राणाचे रक्षण केले, त्याने आमचे पाय ढळू दिले नाहीत.

10 कारण हे देवा, तू आम्हांला पारखले आहेस; रुपे गाळतात तसे तू आम्हांला गाळून पाहिले आहेस.

11 तू आम्हांला जाळ्यांत गुंतवले; तू आमच्या कंबरेला भारी ओझे बांधले.

12 तू मनुष्यांना आमच्या डोक्यांवरून स्वारी करायला लावले; आम्ही अग्नीत व पाण्यात सापडलो, तरी तू आम्हांला बाहेर काढून समृद्ध स्थळी आणलेस.

13 मी होमार्पणे घेऊन तुझ्या मंदिरात येईन, तुला केलेले नवस फेडीन;

14 संकटात असता ते मी आपल्या ओठांनी उच्चारले; मी ते आपल्या तोंडाने केले.

15 मेंढ्यांच्या धूपासहित पुष्ट पशूंचे होम मी तुला अर्पण करीन; बोकडांसह मी गोर्‍हे अर्पण करीन. (सेला)

16 अहो देवाचे भय धरणारे सर्व जनहो, तुम्ही या, ऐका; त्याने माझ्या जिवासाठी जे केले आहे ते मी सांगतो.

17 मी आपल्या मुखाने त्याचा धावा केला, माझ्या जिभेवर त्याचे स्तवन होते.

18 माझ्या मनात दुष्कर्माचा विचार असता तर प्रभू माझे न ऐकता;

19 पण देवाने ऐकलेच आहे; माझ्या प्रार्थनेच्या वाणीकडे त्याने लक्ष दिले आहे.

20 देवाचा धन्यवाद होवो, त्याने माझी प्रार्थना अवमानली नाही, त्याने आपली माझ्यावरची दया काढून घेतली नाही.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan