स्तोत्रसंहिता 65 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)निसर्गामधील देवाच्या समृद्धीबद्दल उपकारस्तुती मुख्य गवयासाठी; दाविदाचे संगीतस्तोत्र. 1 हे देवा, सीयोनेत तुझी स्तुती होवो. तुला केलेल्या नवसाची फेड तेथे होते. 2 तू जो प्रार्थना ऐकतोस त्या तुझ्याकडे सर्व मानवजात येते. 3 दुष्कर्मांनी मला बेजार केले आहे. तरी तू आमचे अपराध नाहीसे करशील. 4 तुझ्या अंगणांत राहण्यासाठी ज्याला तू निवडून घेतोस आणि आपल्याजवळ आणतोस तो धन्य; तुझ्या घरातील, तुझ्या मंदिराच्या पवित्रस्थानातील उत्तम लाभांनी आम्ही तृप्त होऊ. 5 हे आमच्या तारणार्या देवा, पृथ्वीच्या सर्व सीमांचा व दूर समुद्रांवर असलेल्यांचा आधार तू आहेस; तू न्यायाच्या भयंकर कृत्यांनी आम्हांला उत्तर देतोस. 6 तू पराक्रमाने कंबर बांधून आपल्या सामर्थ्याने पर्वत स्थिर ठेवतोस. 7 तू समुद्रांची गर्जना, त्यांच्या लाटांचा कल्लोळ व लोकांची दंगल शमवतोस; 8 म्हणून जे सीमान्त प्रदेशात राहतात तेही तुझ्या उत्पातांना भितात; दिवसाचा उदय व अस्त ह्यांच्या द्वारे तू गजर करवतोस. 9 तू पृथ्वीचा समाचार घेऊन ती भिजवली आहेस; तू तिला फार फलद्रूप करतोस; देवाची नदी जलपूर्ण आहे; भूमी तयार करून तू मनुष्यांना धान्य पुरवतोस. 10 तिच्या तासांना तू भरपूर पाणी देतोस; तिचे उंचवटे सपाट करतोस; तिला पावसाच्या सरींनी मऊ करतोस; तिच्यात उगवलेले अंकुर सफळ करतोस. 11 तू आपल्या प्रसादाने वर्ष भूषित करतोस; आणि तुझे मार्ग समृद्धिमय झाले आहेत. 12 रानांतली कुरणेही समृद्ध होतात; आणि डोंगरांना उल्लासाचे वेष्टन पडले आहे. 13 कुरणे कळपांनी झाकून गेली आहेत; खोरीही धान्याने सुशोभित होऊन गेली आहेत; ती मोठ्याने जयजयकार करतात व गातात. |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India