Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

स्तोत्रसंहिता 63 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


देव तान्हेल्या जिवांचे समाधान करतो
यहूदाच्या रानात असताना रचलेले दाविदाचे स्तोत्र.

1 हे देवा, तू माझा देव आहेस; मी आस्थेने तुझा शोध करीन; शुष्क, रुक्ष व निर्जल प्रदेशात माझा जीव तुझ्यासाठी तान्हेला झाला आहे, माझ्या देहालाही तुझी उत्कंठा लागली आहे.

2 अशा प्रकारे तुझे बळ व वैभव पाहण्यास पवित्रस्थानी मी तुझ्याकडे दृष्टी लावली आहे.

3 तुझे वात्सल्य जीवनाहून उत्तम आहे; माझे ओठ तुझे स्तवन करतील.

4 मी जिवंत आहे तोपर्यंत तुझा धन्यवाद असाच करीन; तुझ्या नावाने मी आपले हात उभारीन.

5 मज्जेने व मेदाने व्हावा तसा माझा जीव तृप्त होईल; आणि माझे मुख हर्षभरित होऊन तुझे स्तवन करील.

6 मी रात्री आपल्या अंथरुणावर पडून तुझे स्मरण करतो, व प्रहरोप्रहरी तुझे ध्यान करीत असतो.

7 कारण तू माझे साहाय्य होत आला आहेस, म्हणून तुझ्या पंखांच्या सावलीत मी आनंद करीन.

8 माझ्या जिवाने तुझी कास धरली आहे; तुझा उजवा हात मला सांभाळून धरतो;

9 पण जे माझ्या जिवाचा घात करण्यास टपले आहेत, ते पृथ्वीच्या अधोभागी जातील.

10 तलवारीने त्यांचा निःपात होईल; ते कोल्ह्यांचे खाद्य होतील.

11 राजा देवाच्या ठायी हर्ष पावेल; जो कोणी त्याची शपथ वाहतो तो उत्साह करील; कारण असत्य बोलणार्‍यांचे तोंड बंद होईल.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan