Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

स्तोत्रसंहिता 62 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


आपली भिस्त केवळ देवावर
मुख्य गवयासाठी; यदूथूनाच्या पद्धतीप्रमाणे दाविदाचे स्तोत्र.

1 माझा जीव केवळ देवावर भिस्त टाकून स्वस्थ राहिला आहे; त्याच्यापासून मला तारणप्राप्ती होते.

2 तोच केवळ माझा खडक, तोच माझे तारण आहे; तोच माझा उंच गड आहे; मी सहसा ढळणार नाही.

3 एकट्या मनुष्याला मारण्यासाठी त्याच्यावर तुम्ही सर्व कोठवर चढाई करून याल? तो झुकलेल्या भिंतीसारखा, कोसळलेल्या कुंपणासारखा आहे.

4 त्याच्या उच्च पदावरून त्याला पाडण्यासाठी मात्र ते मसलत करतात; त्यांना लबाडी आवडते; ते आपल्या तोंडाने आशीर्वाद देतात, पण मनातून शाप देतात. (सेला)

5 हे माझ्या जिवा, तू केवळ देवावर भिस्त टाकून स्वस्थ राहा; कारण माझी आशापूर्ती करणारा तो आहे.

6 तोच केवळ माझा खडक, तोच माझे तारण आहे, तोच माझा उंच गड आहे; मी ढळणार नाही.

7 माझे तारण व माझे वैभव देवावर अवलंबून आहे; माझ्या बलाचा दुर्ग, माझा आश्रय देवच आहे;

8 अहो लोकहो, सर्वदा त्याच्यावर भाव ठेवा; त्याच्यापुढे आपले मन मोकळे करा; देव आमचा आश्रय आहे. (सेला)

9 मानवप्राणी केवळ वाफ आहेत; ते केवळ मिथ्या आहेत; तराजूत घातले असता ते हलके भरतील; ते सर्व वाफच आहेत.

10 जुलूमजबरदस्तीवर भिस्त ठेवू नका, लूट केल्याची शेखी मिरवू नका; संपत्ती वाढली तरी तिच्यावर चित्त ठेवू नका.

11 एकदा देव बोलला आहे; मी दोनदा हे ऐकले आहे की, सामर्थ्य देवाचे आहे.

12 शिवाय, हे प्रभू, तुझ्याच ठायी वात्सल्य आहे; कारण प्रत्येकाला त्याच्या कृतीप्रमाणे तू प्रतिफळ देतोस.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan