Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

स्तोत्रसंहिता 59 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


शत्रूंच्या हातातून सुटका व्हावी म्हणून प्रार्थना
मुख्य गवयासाठी; अल्तश्केथ (नष्ट करू नको) ह्या चालीवर गायचे; शौलाने माणसे पाठवून दाविदाला ठार मारण्याकरता त्याच्या घरावर पहारा ठेवला तेव्हा त्याने रचलेले मिक्ताम नावाचे स्तोत्र.

1 हे माझ्या देवा, माझ्या वैर्‍यांपासून मला सोडव. जे माझ्यावर उठतात त्यांच्यापासून मला वाचव.

2 दुष्कर्म करणार्‍यांपासून मला सोडव; घातकी मनुष्यांपासून माझा बचाव कर.

3 पाहा, ते माझा जीव घ्यायला टपले आहेत; हे परमेश्वरा, माझा अपराध किंवा दोष नसता दांडगे लोक माझ्याविरुद्ध एकत्र जमले आहेत.

4 माझा दोष नसता ते धावून सज्ज होत आहेत. मला साहाय्य करावे म्हणून तू जागा होऊन पाहा.

5 हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, इस्राएलाच्या देवा, तू सर्व राष्ट्रांची झडती घेण्यास जागृत हो; कोणाही दगेखोर दुष्टावर दया करू नकोस. (सेला)

6 संध्याकाळी ते माघारी येतात कुत्र्याप्रमाणे गुरगुरतात व नगराभोवती हिंडतात.

7 पाहा, ते आपल्या मुखावाटे दुष्ट उद्‍गार काढतात; त्यांच्या तोंडचे शब्द तलवारीच आहेत; कारण, “ऐकतो कोण?” असे ते म्हणतात;

8 परंतु हे परमेश्वरा, तू त्यांना हसशील; तू सर्व राष्ट्रांचा उपहास करशील.

9 हे माझ्या सामर्थ्या, मी तुझी प्रतीक्षा करीन; कारण देवच माझा उंच गड आहे.

10 माझा प्रेमळ देव मला भेटेल; देव माझ्या शत्रूंच्या बाबतीत माझे डोळे निववील.

11 त्यांना जिवे मारू नकोस, मारलेस तर माझ्या लोकांना विसर पडेल; हे प्रभू, तू आमची ढाल आहेस; आपल्या बलाने त्यांची दाणादाण कर, त्यांना खाली पाड.

12 त्यांच्या तोंडचे पातक, त्यांच्या मुखांतील शब्द, त्यांनी उच्चारलेले शाप व लबाड्या ह्यांमुळे ते आपल्या गर्वात गुरफटून जावोत.

13 क्रोधाने त्यांचा संहार कर; ते नाहीसे होईपर्यंत त्यांचा संहार कर; देव याकोबावर व पृथ्वीच्या दिगंतापर्यंत सत्ताधारी आहे अशी लोकांची खातरी होवो. (सेला)

14 संध्याकाळी ते माघारी येतात, कुत्र्याप्रमाणे गुरगुरतात व नगराभोवती हिंडतात.

15 ते अन्नासाठी भटकत फिरतात; त्यांची तृप्ती झाली नाही तर सारी रात्र थांबून राहतात.

16 मी तर तुझ्या सामर्थ्याची कीर्ती गाईन, पहाटेस तुझ्या दयेचा गजर करीन; कारण माझ्या संकटाच्या समयी तू मला उंच गड व शरणस्थान झाला आहेस.

17 हे माझ्या सामर्थ्या, मी तुझी स्तोत्रे गाईन; कारण देव माझा उंच गड आहे, माझा देव दयामय आहे.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan