Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

स्तोत्रसंहिता 52 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


ज्ञानशून्य दुष्टांचा फोलपणा
मुख्य गवयासाठी; दाविदाचे मस्कील (बोधपर स्तोत्र); दावीद अहीमलेखाच्या घरी आला आहे असे दवेग अदोमी ह्याने शौलाकडे येऊन कळवले तेव्हाचे.

1 हे बलवान पुरुषा, दुष्कर्माची आढ्यता का मिरवतोस? देवाचे वात्सल्य अखंड आहे.

2 अरे कपट करणार्‍या, तुझी जीभ तीक्ष्ण वस्तर्‍यासारखी अनर्थाची योजना करते.

3 तुला बर्‍यापेक्षा वाइटाची, सत्य बोलण्यापेक्षा असत्याची आवड आहे. (सेला)

4 अगे कपटी जिभे, तुला सर्व विध्वंसकारक शब्द आवडतात;

5 परंतु देव तुझा नाश करील; तो तुला धरून डेर्‍यातून खेचून काढील, व जिवंतांच्या भूमीतून मुळासकट उपटून टाकील. (सेला)

6 नीतिमान हे पाहून भितील, व त्याला हसून म्हणतील,

7 “पाहा, हाच तो पुरुष, ह्याने देवाला आपले आश्रयस्थान केले नाही, तर ह्याने आपल्या विपुल धनावर भरवसा ठेवला आणि हा दुष्कर्माने माजला.”

8 मी तर देवाच्या घरी हिरव्यागार जैतून झाडासारखा आहे; देवाच्या दयेवर सदासर्वकाळ माझा भरवसा आहे.

9 हे तू घडवून आणले आहे म्हणून मी सर्वकाळ तुझे उपकारस्मरण करीन; तुझ्या भक्तांसमोर तुझ्या नावाची घोषणा करीन, कारण ते उत्तम आहे.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan