Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

स्तोत्रसंहिता 5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


संरक्षणासाठी प्रार्थना
मुख्य गवयासाठी; वाजंत्र्यांच्या साथीने गायचे दाविदाचे स्तोत्र.

1 हे परमेश्वरा, माझ्या बोलण्याकडे कान दे, माझ्या चिंतनाकडे लक्ष दे.

2 हे माझ्या राजा, माझ्या देवा, माझ्या धाव्याच्या वाणीकडे कान दे; मी तुझी प्रार्थना करीत आहे.

3 हे परमेश्वरा, प्रातःकाळी तू माझी वाणी ऐकतोस; सकाळी मी प्रार्थना व्यवस्थित रचून तुला सादर करीन, आणि तुझी प्रतीक्षा करीत राहीन.

4 कारण तू दुष्टाईची आवड धरणारा देव नाहीस; दुष्टपणाला तुझ्याजवळ थारा नाही.

5 तुझ्या दृष्टीपुढे बढाई मारणारे टिकणार नाहीत, सर्व कुकर्म करणार्‍यांचा तुला तिटकारा आहे.

6 असत्य भाषण करणार्‍याचा तू नाश करतोस; खुनी व कपटी मनुष्याचा परमेश्वराला वीट येतो.

7 मी तर तुझ्या अपार कृपेने तुझ्या घरात येईन; तुझी भीड धरून तुझ्या पवित्र मंदिराकडे तोंड करून दंडवत घालीन.

8 हे परमेश्वरा, माझ्यासाठी शत्रू टपले आहेत, म्हणून तू मला आपल्या नीतिमार्गाने ने, आपला मार्ग माझ्यापुढे नीट कर.

9 त्यांच्या तोंडाचा भरवसा नाही; त्यांचे अंतर्याम केवळ खाच आहे; त्यांचा घसा केवळ उघडे थडगे आहे; ते आपल्या जिभेने गोडगोड बोलतात.

10 हे देवा, त्यांना दोषी ठरव; ते आपल्या मसलतींत फसोत; त्यांच्या अनेक अपराधांबद्दल त्यांना झुगारून दे, कारण ते तुला जुमानत नाहीत;

11 परंतु तुझा आश्रय करणारे सारे हर्ष करोत; त्यांचे तू रक्षण करतोस म्हणून ते सदा गजर करोत; ज्यांना तुझे नाव प्रिय आहे ते तुझ्या ठायी उल्लास पावोत.

12 कारण तूच नीतिमानाला आशीर्वाद देतोस; हे परमेश्वरा, तू त्याच्याभोवती कवचाप्रमाणे कृपेचे वेष्टन घालतोस.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan