Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

स्तोत्रसंहिता 46 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य
मुख्य गवयासाठी; कोरहाच्या मुलांचे टिपेच्या सुराने गायचे गीत.

1 देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे; तो संकटसमयी साहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो.

2 म्हणून पृथ्वी उलथीपालथी झाली, पर्वत कोसळून सागरतळी बुडाले,

3 सागराच्या लाटा गर्जून उसळल्या, त्यांच्या उचंबळण्याने पर्वत हालले तरी आम्ही भिणार नाही. (सेला)

4 जिचे प्रवाह देवाच्या नगरीला, परात्पराच्या परमपवित्र निवासस्थानाला आनंदमय करतात अशी एक नदी आहे.

5 त्या नगरीच्या ठायी देव आहे; ती ढळावयाची नाही; प्रभात होताच देव तिला साहाय्य करील.

6 राष्ट्रे खवळली, राज्ये डळमळली; त्याने गर्जना केली तो पृथ्वी विरघळून गेली.

7 सेनाधीश परमेश्वर आमच्याबरोबर आहे. याकोबाचा देव आमचा आश्रय आहे. (सेला)

8 या, परमेश्वराची कृत्ये पाहा, त्याने पृथ्वीची कशी नासधूस केली आहे.

9 तो दिगंतापर्यंत लढाया बंद करतो; तो धनुष्य मोडतो, भाला तोडून टाकतो; रथ अग्नीत जाळून टाकतो.

10 “शांत व्हा आणि लक्षात ठेवा की मीच देव आहे, राष्ट्रांमध्ये माझा महिमा वाढेल, पृथ्वीभर माझा महिमा वाढेल.”

11 सेनाधीश परमेश्वर आमच्याबरोबर आहे; याकोबाचा देव आमचा आश्रय आहे. (सेला)

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan