स्तोत्रसंहिता 41 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)रोगनिवारणार्थ प्रार्थना मुख्य गवयासाठी; दाविदाचे स्तोत्र. 1 जो दीनांची चिंता वाहतो तो धन्य! संकटसमयी परमेश्वर त्याला मुक्त करील. 2 परमेश्वर त्याचे रक्षण करील. व त्याचा प्राण वाचवील; भूतलावर तो सुखी होईल, आणि तू त्याला त्याच्या वैर्यांच्या इच्छेवर सोडणार नाहीस. 3 तो रोगाने अंथरुणास खिळला असता परमेश्वर त्याला सांभाळील; तो रोगी असता तू त्याचे अंथरूण बदलतोस.1 4 मी म्हणालो, “हे परमेश्वरा, माझ्यावर कृपा कर; माझ्या जिवाला बरे कर; मी तुझ्याविरुद्ध पाप केले आहे.” 5 माझे वैरी माझ्याविरुद्ध अभद्र बोलून म्हणतात की, “हा केव्हा मरेल आणि ह्याचे नावगाव केव्हा नाहीसे होईल?” 6 त्यांच्यापैकी कोणी माझ्या समाचारास आला तर तो वरपांगी बोलतो; तो आपल्या मनात कुकल्पना साठवतो; आणि बाहेर जाऊन त्या सांगतो. 7 माझे सर्व द्वेष्टे मिळून माझ्याविरुद्ध कुजबुज करतात आणि माझ्या अहिताच्या मसलती योजतात; 8 “त्याला असाध्य रोग जडला आहे, तो पडला आहे, तो आता उठणार नाही” असे ते म्हणतात. 9 जो माझा सखा, ज्याच्यावर माझा विश्वास होता, ज्याने माझे अन्न खाल्ले त्यानेही माझ्यावर लाथ उगारली आहे. 10 हे परमेश्वरा, माझ्यावर दया करून मला उठव, म्हणजे मी त्यांचा बदला घेईन. 11 माझा वैरी माझ्याविरुद्ध जयोत्सव करीत नाही, ह्यावरून तू माझ्यावर प्रसन्न आहेस असे मी समजतो. 12 मला तर तू माझ्या सात्त्विकपणात स्थिर राखतोस, मला तू आपल्या सन्मुख सर्वकाळ ठेवतोस. 13 इस्राएलाचा देव परमेश्वर युगानुयुग धन्यवादित आहे. आमेन, आमेन. |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India