Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

स्तोत्रसंहिता 39 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


आयुष्याची क्षणभंगुरता
मुख्य गवई यदूथून ह्याच्यासाठी दाविदाचे स्तोत्र.

1 मी म्हणालो की, “मी आपल्या जिभेने पाप करू नये म्हणून आपल्या चालचलणुकीस जपेन; माझ्यासमोर दुर्जन आहे तोपर्यंत मी आपल्या तोंडाला लगाम घालून ठेवीन.”

2 मौन धरून मी गप्प राहिलो, बरेदेखील काही बोललो नाही, तरी माझ्या दु:खाने उचल खाल्ली.

3 माझे हृदय आतल्या आत संतप्त झाले; मला ध्यास लागला असता माझ्यामध्ये अग्नी भडकला, तेव्हा मी आपल्या जिभेने बोललो;

4 “हे परमेश्वरा, माझा अंतकाळ केव्हा आहे, व माझे आयुष्यमान किती आहे, हे मला समजू दे; म्हणजे मी किती नश्वर आहे हे मला कळेल.

5 पाहा, तू माझे दिवस वीतभर केले आहेत; माझ्या आयुष्याचा काळ तुझ्यापुढे काही नाही; एखादा मनुष्य कितीही खंबीर असला तरी तो श्वासरूपच होय, हे खास. (सेला)

6 खरोखर मनुष्य छायेसारखा फिरतो, जिभेने तो उगाच धामधूम करतो, तो धन साठवतो, पण ते कोणाच्या हाती लागेल हे त्याला ठाऊक नाही.

7 तर आता हे प्रभू, मी कशाची अपेक्षा करू? माझी आशा तुझ्याच ठायी आहे.

8 माझ्या सर्व अपराधांपासून मला सोडव; मला मूर्खांच्या निंदेस पात्र करू नकोस.

9 मी मौन धरले आहे, आपले तोंड उघडत नाही, कारण हे तूच केले आहेस.

10 तुझा प्रहार माझ्यावरून दूर कर; तुझ्या हाताच्या तडाख्याने माझा क्षय होत आहे.

11 तू मनुष्याला अनीतीबद्दल धमकावून शासन करतोस, तेव्हा तू त्याचे सौंदर्य पतंगाप्रमाणे विलयास नेतोस; खरोखर सर्व माणसे श्वासवत आहेत. (सेला)

12 हे परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक; माझ्या धाव्याकडे कान लाव; माझे अश्रू पाहून उगा राहू नकोस; कारण मी आपल्या सर्व पूर्वजांप्रमाणे तुझ्यापुढे परदेशीय व उपरा आहे.

13 मी येथून जाऊन नाहीसा होण्यापूर्वी आनंदित व्हावे म्हणून माझ्यावर असलेली तुझी क्रोधदृष्टी काढ.”

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan