Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

स्तोत्रसंहिता 37 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


दुष्ट व देवभक्‍त ह्यांचे भवितव्य
दाविदाचे स्तोत्र.

1 दुष्कर्म्यांवर जळफळू नकोस; अन्याय करणार्‍यांचा हेवा करू नकोस.

2 कारण ते गवताप्रमाणे लवकर कापले जातात, हिरवळीसारखे वाळून जातात.

3 परमेश्वरावर भाव ठेव व सदाचाराने वाग; देशात वस्ती करून राहा, इमानाने चाल;

4 म्हणजे परमेश्वराच्या ठायी तुला आनंद होईल; तो तुझे मनोरथ पूर्ण करील.

5 आपला जीवितक्रम परमेश्वरावर सोपवून दे; त्याच्यावर भाव ठेव म्हणजे तो तुझी कार्यसिद्धी करील.

6 तो तुझे नीतिमत्त्व प्रकाशासारखे, तुझे न्यायत्व मध्यान्हासारखे प्रकट करील.

7 परमेश्वराच्या अधीन होऊन स्वस्थ राहा; त्याची प्रतीक्षा शांतपणे करीत राहा; जो मनुष्य आपल्या मार्गाने उत्कर्ष पावतो, जो मनुष्य दुष्ट संकल्प सिद्धीस नेतो त्याच्यावर जळफळू नकोस.

8 राग सोडून दे, क्रोधाविष्टपणाचा त्याग कर; जळफळू नकोस, अशाने दुष्कर्माकडे प्रवृत्ती होते.

9 दुष्कर्म करणार्‍यांचा उच्छेद होईल; पण परमेश्वराची प्रतीक्षा करणारे पृथ्वीचे वतन पावतील.

10 थोडक्याच अवधीत दुर्जन नाहीसा होईल; तू त्याचे ठिकाण शोधशील तरी त्याचा पत्ता लागणार नाही;

11 पण लीन जन पृथ्वीचे वतन पावतील; ते उदंड शांतिसुखाचा उपभोग घेतील.

12 दुर्जन नीतिमानाविरुद्ध मसलती करतो, त्याच्यावर दातओठ खातो.

13 प्रभू दुर्जनाला हसत आहे, कारण त्याचा दिवस येत आहे हे त्याला दिसते.

14 दीनदुबळ्यांना पाडायला, सरळ मार्गाने चालणार्‍यांचा वध करायला दुर्जनांनी तलवार उपसली आहे व धनुष्य वाकवून सज्ज केले आहे.

15 त्यांची तलवार त्यांच्याच उरात शिरेल, आणि त्यांच्या धनुष्यांचा चुराडा होईल.

16 नीतिमानाचे अल्प धन अनेक दुर्जनांच्या विपुल धनापेक्षा उत्तम आहे.

17 दुर्जनांचे बाहू मोडतील, पण नीतिमानांचा आधार परमेश्वर आहे.

18 सात्त्विकांच्या दिनचर्येकडे परमेश्वराचे लक्ष असते; त्यांचे वतन सर्वकाळ टिकेल.

19 ते विपत्काली लज्जित होणार नाहीत; ते दुष्काळाच्या दिवसांत तृप्त राहतील.

20 दुर्जन तर नाश पावतील; परमेश्वराचे वैरी कुरणाच्या क्षणिक शोभेसारखे होतील; ते नाहीसे होतील; ते धुरासारखे नाहीसे होऊन जातील.

21 दुर्जन उसने घेतो आणि परत करीत नाही; नीतिमान उदारपणे वागतो व दान देतो.

22 ज्यांना त्याचा आशीर्वाद प्राप्त होतो ते पृथ्वीचे वतन पावतील; ज्यांना त्याचा शाप लागेल त्यांचा उच्छेद होईल.

23 परमेश्वर मनुष्याची गती स्थिर करतो, आणि त्याचा मार्ग त्याला प्रिय आहे.

24 तो पडला तरी सपशेल पडणार नाही; कारण परमेश्वर त्याला हात देऊन सावरील.

25 मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालो, तरी नीतिमान निराश्रित झालेला किंवा त्याची संतती भिकेस लागलेली मी पाहिली नाही.

26 तो नेहमी उदार असतो, तो उसने देतो; त्याची संतती आशीर्वादित असते.

27 वाइटापासून दूर राहा, बरे ते कर; म्हणजे तुझी वस्ती कायम राहील.

28 कारण परमेश्वराला न्याय प्रिय आहे; तो आपल्या भक्तांना सोडत नाही; त्यांचे रक्षण सर्वकाळ होते; पण दुर्जनांच्या संततीचा उच्छेद होतो.

29 नीतिमान पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करतील.

30 नीतिमानाचे मुख सुज्ञान वदते, त्याची जीभ न्याय उच्चारते.

31 त्याच्या देवाचे नियमशास्त्र त्याच्या हृदयात असते; त्याचे पाय घसरणार नाहीत.

32 दुर्जन नीतिमानावर टपलेला असतो, व त्याला जिवे मारण्यास तो पाहत असतो.

33 परमेश्वर त्याला त्याच्या हाती देणार नाही, त्याचा न्याय होईल तेव्हा तो त्याला दोषी ठरवणार नाही.

34 परमेश्वराची प्रतीक्षा कर व त्याच्या मार्गाचे अवलंबन कर, म्हणजे तो तुझी उन्नती करून तुला पृथ्वीचे वतन देईल; दुर्जनांचा उच्छेद झालेला तू आपल्या डोळ्यांनी पाहशील.

35 मी एक निर्दय दुर्जन पाहिला, तो हिरव्यागार वृक्षासारखा आपल्या जागी विस्तारलेला दिसला;

36 पण मी तिकडून गेलो तेव्हा त्याचा मागमूस राहिला नव्हता; मी त्याचा शोध केला तरी तो सापडला नाही.

37 सात्त्विक मनुष्याकडे लक्ष दे, सरळ मनुष्याकडे पाहा; शांतिप्रिय मनुष्याचा वंश टिकून राहील.

38 पातकी तर पूर्णपणे नष्ट होतील; दुर्जनांचा वंश छाटला जाईल;

39 परंतु नीतिमानांचे तारण परमेश्वरापासून होते; संकटसमयी तोच त्यांचा दुर्ग आहे.

40 परमेश्वर त्यांना साहाय्य करतो व त्यांना मुक्त करतो; त्यांना दुर्जनांपासून मुक्त करतो व तारतो, कारण त्यांनी त्याचा आश्रय घेतला आहे.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan