स्तोत्रसंहिता 36 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)देवाचे अढळ प्रेम मुख्य गवयासाठी; परमेश्वराचा सेवक दावीद ह्याचे स्तोत्र. 1 दुर्जनाच्या मनातून अधर्माचा ध्वनी निघत असतो; त्याच्या दृष्टीपुढे देवाचे भय नाही. 2 आपले पाप उघडकीस येणार नाही, त्याचा कोणी तिटकारा करणार नाही, अशी तो आपल्या मनाची समजूत करून घेतो. 3 त्याच्या तोंडचे शब्द अनीतीचे व कपटाचे असतात; त्याने सुबुद्धी व सद्वर्तन ही टाकून दिली आहेत. 4 तो अंथरुणावर पडल्यापडल्या अनीतीच्या योजना करतो; तो कुमार्ग धरून राहतो, वाइटाचा वीट मानत नाही. 5 हे परमेश्वरा, तुझे वात्सल्य आकाशापर्यंत पोहचले आहे; तुझे सत्य गगनाला जाऊन भिडले आहे 6 तुझे नीतिमत्त्व महान1 पर्वतांसारखे आहे; तुझे निर्णय अथांग महासागरासारखे आहेत; हे परमेश्वरा, तू मनुष्य व पशू ह्यांचा प्रतिपाळ करतोस. 7 हे देवा, तुझे वात्सल्य किती अमोल आहे! मानवजाती तुझ्या पंखांच्या छायेचा आश्रय करते! 8 तुझ्या घरातील समृद्धीने त्यांची तृप्ती होईल, आणि तू आपल्या सुखांच्या नदीचे पाणी त्यांना पाजशील. 9 कारण जीवनाचा झरा तुझ्याजवळ आहे; तुझ्या प्रकाशाने आम्ही प्रकाश पाहतो. 10 तुला ओळखणार्यांस तुझे वात्सल्य सरळ मनाच्यांस तुझे नीतिमत्त्व लाभू दे. 11 गर्विष्ठाचा पाय मला न तुडवो; दुर्जनांचा हात मला हाकून न लावो. 12 पाहा, दुष्कर्म करणारे तेथे पडले आहेत! त्यांना लोटून दिले आहे, त्यांच्याने उठवणार नाही. |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India