Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

स्तोत्रसंहिता 33 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


उत्पन्नकर्त्याची व संरक्षकाची महती

1 अहो नीतिमानांनो, परमेश्वराचा जयजयकार करा; सरळ माणसांना स्तुतिगान शोभते.

2 वीणेवर परमेश्वराचे उपकारस्मरण करा; दशतंतू वाद्यावर त्याचे गुणगान गा.

3 त्याच्यापुढे नवे गीत गा; जयघोष करीत कुशलतेने वाद्ये वाजवा;

4 कारण परमेश्वराचे वचन सरळ आहे; त्याची सर्व कृती सत्याची आहे.

5 त्याला नीती व न्याय ही प्रिय आहेत; परमेश्वराच्या वात्सल्याने पृथ्वी भरली आहे.

6 परमेश्वराच्या शब्दाने आकाश निर्माण झाले; त्याच्या मुखश्वासाने आकाशातील सर्व सैन्य निर्माण झाले.

7 तो समुद्राची जले राशीसारखी एकवट करतो; महासागराचे निधी साठवतो.

8 अखिल पृथ्वी परमेश्वराचे भय धरो; जगात राहणारे सर्व त्याचा धाक बाळगोत.

9 कारण तो बोलला आणि अवघे झाले; त्याने आज्ञा केली आणि सर्वकाही स्थिर झाले.

10 राष्ट्रांच्या मसलती परमेश्वर निरर्थक करतो; लोकांचे संकल्प निष्फळ करतो.

11 परमेश्वराची योजना सर्वकाळ टिकते; त्याच्या मनातील संकल्प पिढ्यानपिढ्या कायम राहतात.

12 ज्या राष्ट्रांचा देव परमेश्वर आहे ज्या लोकांना त्याने आपल्या वतनाकरता प्रजा म्हणून निवडले आहे, ते धन्य!

13 परमेश्वर आकाशातून पाहतो; सर्व मानवजातीला तो निरखतो.

14 तो आपल्या निवासस्थानातून पृथ्वीवर राहणार्‍या सर्वांना न्याहाळून पाहतो.

15 त्या सर्वांची हृदये घडणारा व त्यांची सर्व कामे जाणणारा तो आहे.

16 कोणीही राजा मोठ्या सैन्यबलाने जय पावतो असे नाही; वीरपुरुष आपल्या पराक्रमाने निभावतो असे नाही.

17 जयप्राप्तीसाठी घोडा केवळ व्यर्थ होय; त्याला आपल्या महाबळाने कोणाचा बचाव करता येणार नाही.

18 पाहा, जे परमेश्वराचे भय धरतात व त्याच्या दयेची अपेक्षा करतात,

19 त्यांचा जीव मृत्यूपासून सोडवावा व दुष्काळात त्यांचा प्राण वाचवावा म्हणून त्यांच्यावर त्याची नजर असते.

20 आमचा जीव परमेश्वराची प्रतीक्षा करीत आहे; आमचे साहाय्य व ढाल तोच आहे.

21 त्याच्या ठायी आमच्या हृदयाला आनंद आहे, कारण त्याच्या पवित्र नावावर आमची श्रद्धा आहे.

22 हे परमेश्वरा, आम्ही तुझी आशा धरली आहे. म्हणून आमच्यावर तुझी कृपादृष्टी असो.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan