स्तोत्रसंहिता 25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)मार्गदर्शन, क्षमा आणि संरक्षण ह्यांसाठी प्रार्थना दाविदाचे स्तोत्र. 1 हे परमेश्वरा, तुझ्याकडे मी आपले चित्त लावतो. 2 हे देवा, तुझ्यावर माझी श्रद्धा आहे; माझी फजिती होऊ देऊ नकोस; माझ्या वैर्यांना माझ्यावर विजयी होऊ देऊ नकोस; 3 तुझी कास धरणारा कोणीच फजीत होत नाही! निष्कारण कपट करणारे फजीत होतात. 4 हे परमेश्वरा, तुझे मार्ग मला दाखव; तुझ्या वाटा मला प्रकट कर. 5 तू आपल्या सत्पथाने मला ने, मला शिक्षण दे, कारण तूच माझा उद्धारक देव आहेस; मी तुझी नित्य प्रतीक्षा करतो. 6 हे परमेश्वरा, तू आपला कळवळा व वात्सल्य आठव; ती पुरातन काळापासून आहेत. 7 हे परमेश्वरा, माझी तारुण्यातली पातके व माझे अपराध आठवू नकोस; तू आपल्या वात्सल्यानुसार माझे स्मरण कर. 8 परमेश्वर उत्तम व सरळ आहे, म्हणून तो पातक्यांना सन्मार्ग दाखवतो. 9 तो नम्र जनांना न्यायपथाला लावतो. तो दीनांना आपला मार्ग शिकवतो. 10 परमेश्वराचा करार व त्याचे विधी पाळणार्यांना त्याचे सर्व मार्ग वात्सल्यमय व सत्यपूर्ण आहेत. 11 हे परमेश्वरा, तू आपल्या नावासाठी माझ्या दुष्टाईची क्षमा कर; कारण ती फार झाली आहे. 12 परमेश्वराचे भय धरणारा असा मनुष्य कोण? त्याने जो मार्ग धरला पाहिजे त्याविषयीचे शिक्षण तो त्याला देईल. 13 त्याचा जीव सुखासमाधानाने राहील; त्याचे वंशज पृथ्वीचे वतन पावतील. 14 परमेश्वराचे सख्य त्याचे भय धरणार्यांबरोबर असते; तो आपला करार त्यांना कळवील. 15 माझे नेत्र परमेश्वराकडे नित्य लागले आहेत, म्हणून तो माझे पाय जाळ्यातून सोडवील. 16 माझ्याकडे वळून मला प्रसन्न हो; कारण मी निराश्रित व दीन आहे. 17 माझ्या मनावरचे दडपण काढ; माझ्या संकटातून मला सोडव. 18 माझी दैन्यावस्था व माझे कष्ट पाहा; माझ्या सर्व पापांची क्षमा कर. 19 माझे वैरी पाहा, ते फार झाले आहेत; ते अत्यंत कठोरपणे माझा द्वेष करतात. 20 माझ्या जिवाचे रक्षण कर; मला मुक्त कर; मी तुझा आश्रय धरला आहे म्हणून माझी फजिती होऊ देऊ नकोस. 21 सात्त्विकपण व सरळपण माझे संरक्षण करोत, कारण मी तुझी प्रतीक्षा करीत आहे. 22 हे देवा, इस्राएलास त्याच्या सर्व संकटांतून सोडव. |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India