Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

स्तोत्रसंहिता 22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


दु:खाची आरोळी आणि स्तुतिगीत
मुख्य गवयासाठी; अय्येलेथ हश्शहर (प्रभातहरिणी) ह्या रागावर गायचे दाविदाचे स्तोत्र.

1 माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास? माझा दुःखाचा आक्रोश ऐकून माझा बचाव करण्यास तू जवळ नाहीस.

2 माझ्या देवा, दिवसा मी धावा करतो तरी तू ऐकत नाहीस; रात्रीही धावा करतो तरी मला चैन पडत नाही.

3 तरीपण, हे इस्राएलाच्या स्तवनात वसणार्‍या, तू पवित्र आहेस.

4 आमचे पूर्वज तुझ्यावर भाव ठेवत; ते तुझ्यावर भाव ठेवत असत आणि तू त्यांना मुक्त करत होतास.

5 ते तुझा धावा करत आणि मुक्त होत. ते तुझ्यावर भाव ठेवत, आणि निराश होत नसत.

6 मी तर कीटक आहे, मानव नव्हे; मनुष्यांनी निंदलेला, लोकांनी धिक्कारलेला आहे.

7 मला पाहणारे सर्व माझा उपहास करतात, वाकुल्या दाखवतात, थट्टेने डोके डोलवतात;

8 ते म्हणतात, “त्याने परमेश्वरावर आपला हवाला टाकला आहे; तो त्याला मुक्त करो; तो त्याला सोडवो, कारण तो त्याचा आवडता आहे.”

9 परंतु मला उदरातून बाहेर आणणारा तूच आहेस; मी आपल्या आईच्या अंगावर पीत होतो तेव्हा तू मला तुझ्यावर भाव ठेवण्याची स्फूर्ती दिलीस.

10 मी जन्मलो तेव्हापासून मला तुझ्या हाती सोपवलेले आहे; मातेच्या उदरातून बाहेर पडलो तेव्हापासून तूच माझा देव आहेस.

11 माझ्यापासून दूर राहू नकोस, कारण संकट येऊन ठेपले आहे; आणि साहाय्य करणारा कोणी नाही.

12 पुष्कळ गोर्‍ह्यांनी मला वेढले आहे; बाशानातील दांडग्या गोर्‍ह्यांनी मला घेरले आहे.

13 फाडून टाकणार्‍या व गर्जना करणार्‍या सिंहासारखे ते तोंड वासून माझ्यावर आले आहेत.

14 मी पाण्यासारखा ओतला गेलो आहे; माझ्या हाडांचे सर्व सांधे ढिले झाले आहेत; माझे हृदय मेणासारखे झाले आहे; ते आतल्या आत वितळले आहे.

15 माझी शक्ती आटून खापरीसारखी झाली आहे; माझी जीभ माझ्या टाळूला चिकटली आहे; तू मला मरणाच्या धुळीस मिळवत आहेस.

16 कुत्र्यांनी मला वेढले आहे; दुर्जनांच्या टोळीने मला घेरले आहे; त्यांनी माझे हातपाय विंधले आहेत.

17 मला आपली सर्व हाडे मोजता येतात; ते माझ्याकडे टक लावून पाहतात.

18 ते माझी वस्त्रे आपसांत वाटून घेतात आणि माझ्या झग्यावर चिठ्ठ्या टाकतात.

19 तर तू, हे परमेश्वरा, मला अंतर देऊ नकोस; हे माझ्या सामर्थ्या, माझ्या साहाय्यासाठी त्वरा कर.

20 तू माझा जीव तलवारीपासून सोडव; कुत्र्याच्या पंजांतून माझा प्राण सोडव.

21 सिंहाच्या जबड्यापासून मला वाचव, रानबैलांनी मला शिंगांवर घेतले असता तू माझा धावा ऐकलास.

22 मी आपल्या बांधवांजवळ तुझ्या नावाची कीर्ती वर्णीन; मंडळीत तुझे स्तवन करीन.

23 अहो परमेश्वराचे भय धरणार्‍यांनो, त्याचे स्तवन करा; याकोबाचे वंशजहो, तुम्ही सर्व त्याचा गौरव करा; इस्राएलाचे वंशजहो, तुम्ही सर्व त्याचे भय धरा.

24 कारण त्याने पीडिताची दैन्यावस्था तुच्छ लेखली नाही व तिचा वीट मानला नाही. त्याने आपले मुख त्याच्या दृष्टिआड केले नाही; तर पीडिताने धावा केला तेव्हा त्याने तो ऐकला.

25 महामंडळात तुझ्यामुळेच मी स्तवन करतो; त्याच्या भक्तांसमक्ष मी आपले नवस फेडीन.

26 दीन जन अन्न सेवन करून तृप्त होतील; परमेश्वराला शरण जाणारे त्याची स्तुती करतील; तुम्ही चिरंजीव असा.

27 दिगंतरीचे सर्व जन परमेश्वराला स्मरून त्याच्याकडे वळतील; सगळी राष्ट्रकुले तुला दंडवत घालतील.

28 कारण राज्य परमेश्वराचे आहे; तोच राष्ट्रांचा शास्ता आहे.

29 पृथ्वीवरील सर्व थोर लोक भोजन करतील व त्याला भजतील; धुळीस मिळणारे सर्व त्याला नमन करतील, ज्याला आपला जीव वाचवता येत नाही तोही नमेल.

30 त्यांचे वंशजही त्याची सेवा करतील; पुढील पिढीच्या लोकांना प्रभूविषयी कथन करतील.

31 तेही येऊन भावी पिढीला त्याचे न्याय्यत्व कळवतील. त्यानेच हे सिद्धीस नेले असे म्हणतील.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan