स्तोत्रसंहिता 149 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)इस्राएलाने परमेश्वराची उपकारस्तुती करावी असा आदेश 1 परमेशाचे स्तवन करा!1 नवे गीत गाऊन परमेश्वराचे गुणगान करा. भक्तांच्या मंडळीत त्याचे स्तोत्र गा. 2 इस्राएल आपल्या निर्माणकर्त्याच्या ठायी आनंद करो; सीयोनेची मुले आपल्या राजाच्या ठायी उल्लास पावोत. 3 ती नृत्य करीत त्याच्या नावाचे स्तवन करोत. डफ व वीणा ह्यांवर त्याला स्तोत्रे गावोत. 4 कारण परमेश्वर आपल्या लोकांवर संतुष्ट आहे; तो दीनांना तारणाने सुशोभित करतो. 5 भक्त गौरवामुळे उल्लासोत; ते आपल्या अंथरुणांवरून हर्षघोष करोत. 6 परमेश्वराची परमश्रेष्ठ स्तुती त्यांच्या कंठी असो; दुधारी तलवार त्यांच्या हाती असो; 7 तिच्या योगे राष्ट्रांचा सूड त्यांनी उगवावा आणि लोकांना शासन करावे. 8 त्यांच्या राजांना साखळदंडांनी बांधावे आणि त्यांच्या सरदारांना लोखंडी बेड्या घालाव्यात. 9 लिहून ठेवलेला निवाडा त्यांच्यावर बजवावा, हे त्याच्या सर्व भक्तांना भूषण होईल. परमेशाचे स्तवन करा!1 |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India