Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

स्तोत्रसंहिता 140 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


छळणार्‍यांपासून संरक्षण मिळावे म्हणून प्रार्थना
मुख्य गवयासाठी; दाविदाचे स्तोत्र.

1 हे परमेश्वरा, मला दुष्ट मनुष्यापासून सोडव; जुलमी मनुष्यापासून माझे रक्षण कर.

2 ते आपल्या मनात दुष्कर्मे योजतात; ते सतत लढाई उपस्थित करतात,

3 ते आपली जीभ सर्पासारखी तिखट करतात त्यांच्या ओठाखाली नागांचे विष आहे. (सेला)

4 हे परमेश्वरा, दुर्जनांच्या हातून माझा बचाव कर; जुलमी मनुष्यापासून माझे रक्षण कर; माझी पावले घसरावीत अशी ते योजना करतात.

5 गर्विष्ठ माझ्यासाठी पाश व दोर्‍या छपवून मांडतात; ते रस्त्याच्या बाजूस जाळे पसरतात; ते माझ्यासाठी सापळे लावतात. (सेला)

6 मी परमेश्वराला म्हणतो, तू माझा देव आहेस; हे परमेश्वरा, माझ्या विनवण्यांच्या वाणीकडे कान दे.

7 हे परमेश्वरा, माझ्या प्रभू, माझ्या तारणसामर्थ्या, तू लढाईच्या प्रसंगी माझे शिरस्त्राण आहेस.

8 हे परमेश्वरा, दुर्जनाच्या इच्छा पुरवू नकोस, त्याची दुष्ट योजना सिद्धीस जाऊ देऊ नकोस; नाहीतर तो उन्मत्त होईल. (सेला)

9 ज्यांनी मला घेरले आहे त्यांच्या वाचेपासून होणारा अनर्थ त्यांच्याच शिरी पडो.

10 त्यांच्यावर इंगळ पडोत; ते अग्नीत टाकले जावोत, ज्यांतून त्यांना उठून वर येता येणार नाही अशा खाचांत ते टाकण्यात येवोत.

11 दुर्भाषण करणारा मनुष्य पृथ्वीवर टिकणार नाही; जुलमी मनुष्याच्या पाठीस अरिष्ट एकसारखे लागेल.

12 परमेश्वर दीनाच्या पक्षाचे, दरिद्र्यांच्या वादाचे समर्थन करील, हे मला ठाऊक आहे.

13 नीतिमान तुझ्या नावाचे उपकारस्मरण खचीत करतील; सरळ मनाचे तुझ्यासमोर बसतील.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan